पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
पुणे सारख्या शहरात लाचेचे प्रकार काही कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे.जीएसटी क्रमांक मंजुर करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या महिला अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने जीएसटी कार्यालयात खळबळ उडाली आहे.
मालती रमेश कठाळे, वय ४३ वर्ष, पद राज्यकर अधिकारी, वस्तु व कार्यालय सेवाकर विभाग, येरवडा, पुणे वर्ग-२ असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.आज ६ मार्च रोजी वस्तु व सेवाकर कार्यालय, येरवडा येथे कारवाई करण्यात आली.
तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने नवीन जी.एस.टी. नंबर घेण्यासाठी वस्तु व सेवाकर विभागास ऑनलाईन अर्ज केला असून, त्यासाठी पंचवीसशे रुपये भरले होते. सदरचे प्रकरण लोकसेविका मालती कठाळे यांचेकडे प्रलंबित होते.
लोकसेविका मालती कठाळे यांनी तक्रारदार याना समक्ष बोलवून नवीन जी.एस.टी.नंबर मंजुर करून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे ३ हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेविका मालती कठाळे यांनी तक्रारदार यांचेकडे नवीन जीएसटी नंबर देण्यासाठी ३ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करुन, लोकसेविका मालती कठाळे यानी तक्रारदार यांचेकडून ३ हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्यावर त्याना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात, गुन्हा नोंद करण्याची करण्याची प्रक्रिया सुरु आहे.लाचलुचपत प्रतिबंध विभागातील पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, पुणे परिक्षेत्र, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.