पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे मनपा शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराबद्दल जेवढे बोलता येईल तेवढे कमीच आहे. रोजच्या दैनंदिन कामकाजाचे नागरिकांना येणारे अनुभव काही कमी नाही. तर अनेक चौकश्यांना खतपाणी घातले जात असल्याचे दिसून येते आहे?
पुण्यातील हडपसर सय्यदनगर येथील आयडियल ऐजुकेशन ट्रस्ट संचालित शाळेच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अजहर खान यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयोगाने त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु ते निर्देश शिक्षण विभागाने वाऱ्यावर ठेवून त्या निर्देशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विजय आवारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती आणि दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे पत्र काढले होते.
परंतु वेळेत काम करतील ते कर्मचारी कसले? आवारी यांनी अर्धवटराव सारखे अर्धवट अहवाल सादर केला होता त्याला खान यांनी विरोध करून पुन्हा सविस्तर अहवाल घेण्याची मागणी केली होती. परंतु दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी शिक्षणाधिकारी व इतरांना आयोगाकडे अहवाल सादर करण्याचा विसरच पडला आहे. का आयोगाच्या निर्देशाला केराची टोपली दाखवली आहे?
शिक्षण विभागाने दाखवून दिले आहे की ते सुद्धा महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाला घाबरत नाही म्हणून? या संदर्भात अजहर खान यांनी आयोगाला पत्र पाठवून पुणे महानगर पालिका आयुक्त व शिक्षणाधिकाऱ्यांनाच थेट जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणी आयोगाकडे केली आहे. तर पुणे महानगर पालिका आयुक्तांकडे विजय आवारी यांना निलंबित करण्याची देखील मागणी खान यांनी केली आहे.