हडपसर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील हडपसर परिसरात बिर्याणीवरून जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन जणांनी केटरिंग व्यावसायिकाला बेदम मारहाण केली आहे.आरोपींनी लोखंडी सळईने त्यांच्यावर वार केले आहेत.
संबंधित प्रकार गुरुवारी रात्री हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी घडला आहे.या प्रकारानंतर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शुभम हनुमंत लोंढे वय २३, ऋषिकेश समाधान कोलगे वय २३ आणि विनायक परशुराम मुरगंडी वय २१,असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. मैनुद्दीन जलील खान वय ४२ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मैनुद्दीन खान याचं हडपसर परिसरातील बोराटे नगर याठिकाणी केटरिंगचा व्यवसाय आहे.येथून फिर्यादी खान बिर्याणीसह अन्य खाद्य पदार्थाचे पार्सल देतात. दरम्यान, घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास संबंधित तिन्ही आरोपींनी फिर्यादी खान यांच्याकडून बिर्याणी पार्सल घेतली होती.
बिर्याणी घेतल्यानंतर तिन्ही आरोपी निघून जात होते. यावेळी खान यांनी आरोपींना अडवलं आणि बिर्याणीचे पैसे देण्याची विनंती केली.पण आरोपींनी बिर्याणीचे पैसे देण्याऐवजी खान यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली. त्यामुळे हा वाद वाढत गेला.
यानंतर संतापलेल्या तिन्ही आरोपींनी टीका भाजण्याच्या सळईने केटरिंग व्यावसायिकाला मारहाण केली. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत ही भांडणं मिटवली.
या धक्कादायक प्रकारानंतर खान यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत, तिन्ही आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस संबंधित तिघांची कसून चौकशी करत आहे.