दहशत निर्माण करणाऱ्यांवर मोकका दाखल करण्याची मागणी होत आहे.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.
कोंढव्यात अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांनी उन्माद मांडला आहे. अनधिकृत बांधकामे करायची व तक्रारदाराला मारहाण करून दहशत निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे.महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रार केल्याच्या रागातून तीन जणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली आहे. तसेच कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथील बेलोसिमा अपार्टमेंटमध्ये घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पंकज श्रीकांत देवळे वय-४१ रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा बुद्रुक यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आसिफ शेख वय-३०, जहिद शेख वय-३५, उमेश माने वय-३५ तिघे रा. बेलोसिमा अपार्टमेंट, कोंढवा खुर्द यांच्यावर आयपीसी ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच सोसायटीत राहतात. सोसायटीमध्ये फ्लॅट धारकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. याबाबत फिर्याद यांनी पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अर्ज केला आहे.
या अर्जामध्ये आरोपी आसिफ शेख व उमेश माने यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती दिली आहे. याचा राग मनात धरुन आरोपींनी मंगळवारी रात्री फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला.आरोपींनी फिर्यादी यांना तु आमच्या विरुद्ध तक्ररी करतो, आमची खुप वरपर्यंत ओळख आहे असे म्हणून शिवीगाळ केली.
तसेच हाताने मारहाण करुन तुला इथे राहू देणार नाही अशी धमकी दिली.तसेच पत्नी व मुलाला मारण्याची धमकी फिर्यादीत नमूद केले आहे.घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी स्थळी भेट दिली.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.