पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
गंगाधाम शत्रुजंय मंदिर (कोंढवा) रस्त्याच्या दुतर्फा मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि शोरूम्स झाली आहेत. हा परिसर हिलटॉप हिलस्लोप असून येथे बांधकामाला परवानगी नाही. यानंतरही सुमारे १०० हून अधिक छोटी मोठी गोदामे आणि दुकाने उघडण्यात आली आहे. या गोदामांवर महापालिका सातत्याने कारवाई करत आहे.
तसेच मिळकत कर विभागाने त्यांना तीनपट कर आकारणी केली आहे. मात्र, यानंतरही बेकायदा कामांना कुठलाही चाप बसलेला नाही. मध्यंतरी येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी प्रचंड नुकसान झाले आहे.
आगीच्या घटनांच्यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्यादेखिल घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. यासंदर्भात अजहर अहमद खान यांनी पुणे महानगर पालिकाकडे लेखी तक्रार करून अनधिकृत बांधकामे पाडण्याची मागणी केली होती. तर बुधवारी प्रकाश मुथा या व्यावसायीकाचे सुमारे ४ हजार चौ. फूटांचे टाईल्सचे शोरूम बांधकाम विभागाच्यावतीने जमीनदोस्त करण्यात आले आहे.
अशी माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उमेश शिद्रुक यांनी दिली. शिद्रुक यांनी सांगितले, की येथील बेकायदा बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने नोटीस बजावूनही त्याला प्रतिसाद देत नाहीत, अशा व्यावसायीकांची शोरुम्स आणि गोदामे पाडण्याचे काम पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार आहे.