बँक खात्यातून परस्पर ४९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, आपल्याला येणाऱ्या मेसेज मधील ओटीपी क्रमांक कोणालाही देण्यात येऊ नये यासाठी पोलीसांकडून वारंवार सुचना दिल्या जात असल्यातरी त्याकडे दुर्लक्ष करून स्वतः पोलीसच सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अटकत असल्याचे समोर येत आहे.
असाच एक प्रकार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उघडकीस आला आहे.एका सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांना सायबर चोरट्यांनी केवायसी अपडेटच्या नावाखाली गंडा घातला आहे.
याप्रकरणी बालेवाडी येथे राहणारे ६३ वर्षांच्या सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्तांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी सहायक पोलीस आयुक्तांना मोबाईलवर फोन करुन तुमचे सीम कार्ड केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना लिंक पाठवून ती लिंक अपलोड करायला सांगितली. त्यानंतर आलेला ओटीपी त्यांच्याकडून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक खात्यातून परस्पर ४९ हजार रुपये सायबर चोरट्याने काढून घेतले.
हा प्रकार ३ जुलै २०२१ रोजी घडला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.