पुणे सिटी टाईम्स ( PCT ONLINE) प्रतिनिधी.
कसबा पेठेतील आमदार रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे आमदार रवींद्र धंगेकर यांना चांगलेच भोवले आहे. महापालिकेच्या अभियंता संघाच्या निषेधानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार धंगेकर यांच्याविरुद्ध कलम ३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोखलेनगर परिसरातील आशानगर येथे महापालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दरम्यान, संबंधित कार्यक्रमास काँग्रेस पक्षाला डावलल्याचा आरोप करून आमदार रविंद्र धंगेकर यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते.
त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.दरम्यान, महापालिकेच्या अभियंता संघाने याप्रकरणी सोमवारी सभा घेत धंगेकर यांच्या कृतीचा निषेध नोंदविला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाणे गाठून धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.