शासकीय धान्यचा अवैधरित्या साठा करणा-या विरोधात तक्रारी करण्याचे देशमुख यांचे आव्हान.
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
शासकीय रेशनिंग धान्याची अफरातफर करणा-यांची आता खैर नाही पुरवठा विभागाने अफरातफर करणा-यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. असाच एक गुन्हा खडकी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. खडकी येथील रास्तभाव दुकानातील धान्याचा अवैधरीत्या साठा केल्याबाबत पुरवठा विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली.पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त डॉ.त्रिगुण कुलकर्णी यांना खडकी येथे धान्याचा अवैध साठा केलेल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे ३० जानेवारी रोजी पुणे विभाग कार्यालयातील तहसीलदार सुनंदा भोसले व विभागीय गोदाम निरीक्षक संतोष सरडे हे दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रास्तभाव दुकान परवानाधारक शिलाबेन दिलीप कुमार शहा यांच्या दुकानात पोचले. तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी अपर्णा तांबोळी, परिमंडळ अधिकारी ‘क’ विभाग (प्रभारी) गजानन देशमुख, पुरवठा निरीक्षक ‘क’ विभाग स्नेहल गायकवाड यांच्या उपस्थितीत संबंधित रास्तभाव दुकानाची तपासणी केली.
सरकारी धान्य साठ्याची मोजणी करून हा धान्यसाठा पंचनामा करून सील करण्यात आला. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान रास्तभाव दुकान परवानाधारक शीलाबेन शहा यांच्या दुकानात पुस्तकी साठ्यापेक्षा ३०.०४ क्विंटल गहू व १४१.५० क्विंटल तांदूळ, असा एकूण १७१.५४ क्विंटल अतिरिक्त धान्य साठा आढळून आला.त्यानुसार रास्तभाव दुकान परवानाधारक शिलाबेन शहा यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये खडकी पोलिस ठाण्यात परिमंडळ अधिकारी ‘क’ विभाग
(प्रभारी) गजानन देशमुख यांनी गुन्हा दाखल केला.
कारवाईमुळे रास्त भाव दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून गोरगरिबांच्या हक्काच्या धान्याचा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.