पुणे सिटी टाईम्स 24 : प्रतिनिधी:
इंधन दरवाढीने आधीच हैराण झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरांत पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या १४.२ किलोच्या LPG सिलिंडरचा दर राजधानी दिल्लीतील ८५९.५ रुपये झाला आहे. याआधी दिल्लीमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत ८३४ रुपये इतकी होती. आर्थिक राजधानीमध्येही गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मुंबईत गॅसची किंमत ८३४.५ रुपये इतकी होती. आता यामध्ये २५ रुपयांनी वाढ झाली असून मुंबईत गॅस ८५९.५ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्येही १४ किलोच्या घरगुती गॅसची किंमत ८८६ रुपये इतकी झाली आहे. याआधी कोलकातामध्ये गॅस सिलिंडर ८६१ रुपयांना मिळत होता. चेन्नईमध्ये ८७५.५ तर लखनऊमध्ये ८९७.५ रुपयांना १४ किलोचा गॅस मिळेल. याचबरोबर १९ किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर ६८ रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर १६१८ रुपये झाला आहे.