पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुणे शहरातील सुप्रसिद्ध असलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चंदनाची ११ झाडे चोरी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. यापूर्वीही मोर, घुबडासह चार वेळा चंदनचोरी झालेली असताना पाचव्यांदा झालेल्या चंदन चोरीच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
प्राणी संग्रहालयात असलेल्या तलावालगत रात्री अकराच्या सुमारास बॅटरीचा उजेड दिसत आहे, असा फोन गेटवर असलेल्या सुरक्षा जमादारांना आला. त्यांनतर सुरक्षा रक्षकांनी संचालकांना कल्पना दिली. सुरक्षा रक्षक व संचालक घटनास्थळी पोहचेपर्यंत चोरांनी चंदनाची ११ झाडे कापून नेल्याचे निदर्शनास आल्याचे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले. याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांत सुरक्षारक्षक अनिल वणवे यांनी फिर्याद दिली आहे.
१३० एकर जागेत असलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात ६१ प्रजातीचे ४२५ वन्यजीवांचे वास्तव्य आहे. संग्रहालयात चंदनासारख्या मौल्यवान वृक्षांचाही समावेश आहे. चंदनाची मागणी अधिक असल्याने त्याची बेकायदेशीरपणे तस्करी केली जाते. प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी जवळपास ४० सुरक्षारक्षक आहेत. तसेच ६६ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
सुरक्षा राक्षकांसाठी दरमहा अंदाजे दहा ते बारा लाख रुपये मनपा प्रशासन खर्च असताना अशा घटना घडत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. प्राणी संग्रहालयात यापूर्वी झालेल्या चोऱ्यापैकी एकाही चोराचा तपास लागलेला नाही. म्हणून चोरीच्या वारंवार घटना घडतात काय?
असा प्रश्न उपस्थित होतो.प्राणी संग्रहालयातील चंदन गाभ्याची तपासणी व ११ झाडांची तोडणी हे काम एक दोन व्यक्तीचे काम नाही. चोरी करत असताना सुरक्षा यंत्रणेला याचा कसलाच सुगावा लागत नाही.
चंदन चोरीला अंतर्गत सुरक्षा यंत्रणेतील कुणाचा सहभाग तर नाही ना? तसेच संग्रहालयात चोराचा प्रवेश ६६ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला नाही. संग्रहालयास चारही बाजूने सुरक्षा भिंत आहे. ११चंदनाच्या झाडांच्या बुडाखे घेऊन चोर सुरक्षा भिंतीवरून बाहेर कसे घेऊन गेले, असे अनेक प्रश्न यानिमीत्त उपस्थित होत आहेत.