विश्रांतवाडीत भर चौकात मद्यधुंद होऊन तलवार फिरवणारा वाहतूक पोलीस निलंबित; पोलिस दलात खळबळ

0
Spread the love

वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी काढले निलंबनाचे आदेश

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

विश्रांतवाडी भागात वाहतूक शाखेतील मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने तलवार नाचवत नंगानाच करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भर रस्त्यात दहशत माजविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय ऊर्फ करण लक्ष्मण जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.जाधव मुंढवा वाहतूक शाखेत नियुक्तीस आहे. धानोरीतील जाणता राजा चौकात जाधव तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला पकडले.चौकशीत जाधव हा वाहतूक शाखेत पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले. जाधव याने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्याच्या विरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.जाधव याची चौकशी करण्यात आली. जाधव याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने त्याला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here