दोन पेक्षा जास्त पोलिस रस्त्यावर उभे राहू नये, या वरिष्ठांच्या आदेशालाच केराची टोपली?
भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आहे का? वाहतूक कोंडी करण्यासाठी?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) अजहर खान
सध्या मार्च एंड सुरू झाल्याने रस्त्यावरून गायब झालेले वाहतूक पोलिस चौका चौकात घोळक्याने प्रकट झाल्याचे पुणेकरांना उघड डोळयासमोर दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दगडूशेठ गणपती मंदिर येथे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याऐवजी वसुली करणा-या वाहतूक पोलिसाला वाहतूक पोलिस उपायुक्त (डीसीपी) विजयकुमार मगर यांनी निलंबित केले होते.

त्या आधारे पुणेकरांना वाटले होते की आतातरी रस्त्यावरची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस तत्पर असतील,परंतु तसे न होता फक्त एकच दिवस गायब होऊन, पुन्हा आता घोळक्याने बलीचा बकरा शोधत असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे.
भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस हे दिवसभर कारवाईत मग्न असल्याचे पुणे सिटी टाईम्सच्या निदर्शनास आले आहे. रोजचेच वाहने अडवून चिरीमिरी घेऊन वाहने सोडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. तर या रोजच्या कारवाईवर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तत्कालीन वाहतूक पोलीस उपायुक्त यांनी दोन अंमलदारांपेक्षा जास्त पोलिस कर्मचारी रस्त्यावर थांबू नये असे आदेश काढले होते.
ते आदेश अद्यापही कायम असूनही वाहतूक पोलिसांनी ते आदेश धाब्यावर बसवून एका चौकात चार-पाच कर्मचारी थांबत असल्याचे चित्र आहे. आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या व त्यांची ड्युटी लावणाऱ्या वरिष्ठांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून वाहतूक पोलीस उपायुक्त विजय मगर नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्त करून नियमबाह्य वसुली करणाऱ्या वसुली बाहदारांवर कारवाई करणार का असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे. पोलिस उपायुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.