कोंढव्यातील पुणे महानगर पालिकेच्या हस्तांतर जागेवर बांधकाम व्यावसायिकाचा अनधिकृत ताबा?

0
Spread the love

मालमत्ता व्यवस्थापन विभाग व बांधकाम विभाग होते अनभिज्ञ. ( Kondwa News)

बांधकाम विकास विभागाचे बांधकाम व्यावसायिकांना जागा खाली करण्याचे पत्र.( Pmc)

पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करताना पुणे महानगर पालिकेकडे नियमानुसार १५% प्रमाणे ॲमिनेटी स्पेसची ( amenity space) जागा वर्ग करणे बंधनकारक असताना बांधकाम व्यावसायिकाने ती जागा वर्ग न करता थेट त्या जागेवरच नव्याने बांधकाम सुरू केल्याचे “पुणे सिटी टाईम्सच्या” निर्दशनास आले आहे.

विशेष म्हणजे सदरील जागेवरील बांधकाम होण्यापर्यंत पुणे महानगर पालिकेला याचा थांगपत्ताच लागलेला नव्हता. याचा बोभाटा झाल्यावर यंत्रणा खळबळून झागे होत संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पत्र ( later) काढून जागा खाली करण्याचे सांगितले आहे. हकीकत अशी की कोंढवा खुर्द येथील सर्वे नंबर ४८ हिस्सा नंबर २/१ चेतना गार्डन ( Chetna garden Kondhwa) मध्ये बांधकाम व्यावसायिक जी.अ.जगताप व टी.एन. गायकवाड व इतरांनी बांधकाम करताना पुणे महानगर पालिकेच्या अटी व शर्ती नुसार १५ टक्के जागा पुणे महानगर पालिकेकडे ॲमिनेटी स्पेस म्हणून हस्तांतर करण्यात येईल असे सन २०१० मध्ये व्यवसायिकांनी प्रतिज्ञापत्र ( ॲफिडेवीट) मनपाकडे दिले होते.

प्रतिज्ञापत्र दिले मात्र ती जागा तब्बल ११ वर्षे पालिकेकडे वर्ग न करता त्या ठिकाणी आज अनधिकृत बांधकामे उभे असल्याचे उघड डोळ्यांनी दिसत आहे. सदरील जागा वर्ग करण्याची नियतच नसल्याने व त्या जागेवर डोळा असल्याने ती जागा आज हडपण्यात आली असताना पुणे महानगर पालिकेतील बांधकाम विकास विभाग व मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे?

तर मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आमच्याकडे सदरील जागेचा ताबाच आला नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. सदरील मिळकती संदर्भात दोघाही विभागाना माहिती नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.


पुणे मनपा मधील अधिका-यांकडे माहिती घेतली असता १५% प्रमाणेे अंदाजे २७ गुंठ्या पेक्षा जास्त जागा ॲमिनेटी स्पेस असल्याची कागदपत्रात दिसून येत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. पुणे मनपाने काढलेल्या पत्रात नमूद आहे की सदर मिळकती मधील ॲमेनिटी स्पेस मध्ये अनधिकृत बांधकामे केल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले असून त्यास आमचे विभागामार्फत योग्य त्या कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तरी सदर ॲमेनिटी स्पेस ची जागा खाली करून त्वरित पुणे मनपास हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आमचे विभागामार्फत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी असे १६ नोव्हेंबरच्या पत्रात नमूद आहे.

अधिक माहिती घेतली असता सदरील जागेचे तुकडे (४-५ गुंठयाचे) प्लॉट करून विकले गेले आहे. यात काही माननीयांचे हात असल्याची माहिती मिळाली, तर ते माननीय कोण? यात त्यांचा हिस्सा किती? हिस्सा नसेल तर माननीयांनी बांधकाम व्यावसायिकांनी सदरील जागा गिळंकृत केल्याप्रकरणी सर्व साधारण सभेत आवाज का नाही उचलला? असा प्रश्न अख्ख्या कोंढवा वासियांना पडला आहे.

तर विषेश म्हणजे ॲमिनेटी स्पेस जागेवर जाण्यासाठी प्लान नुसार दुसरा पर्याय मार्ग दाखवण्यात आला असला तरी आज त्याठिकाणी इमारती उभ्या राहिल्या आहेत. कधी मनपाने त्याठिकाणी कारवाई करून प्लॉट रिकामे करून उद्यान किंवा हॉस्पिटल बनवल्यानंतर दुसरा पर्याय मार्गच उपलब्ध नसेल तर नागरिक जाणार कोठून? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अमेनिटी स्पेस जागेचा वापर हा नागरिक व रहिवाशांसाठी शाळा, उद्यान, दवाखाना याबाबत होत असतो परंतु आज सदरील जागेवरच अतिक्रमण झाले असून सदरील अतिक्रमण धारकांनी आपापसात साटेलोटे करून नागरिकांच्या हक्कावर गदा आणली आहे.

तरही जागा मनपाने ताबडतोब ताब्यात घेऊन नागरिकांची व स्थानिक रहिवाशांची सोय होईल अशी सुविधा देण्यात यावी तसेच सदरील बांधकाम व्यावसायिकाने मनपाच्या ताब्यात सदरील जागा का दिली नाही? त्याचे मागचे गौडबंगाल काय आहे? याचा शोध घ्यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. क्रमशः

    ...............चौकट.............

सदरील बांधकाम व्यावसायिकाने टीडीआर घेतले नसेल तरीही नियमानुसार १५ टक्के जागा ही ॲमिनेटी स्पेस म्हणूनच ठेवावी लागते मालक, विकासक सदरील जागेवर बांधकाम करू शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here