पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
सकाळी पहाटेपर्यंत बार उघडा ठेवून त्यात मोठमोठ्याने सुरु असलेली भांडणे थांबविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाच्या वर्दीवरच गचंडी धरून मद्यधुंद तरुणाने ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी रतन अभंगराव सूर्यवंशी ( शंकर महाराज मठामागे,ईशान्य इमारत ) याला अटक केली आहे.
याबाबत पोलीस शिपाई अभिजित प्रल्हाद गोंजारी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद गु. रजि.नं . १२५/२३ दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांचे सहकारी दुचाकीवरुन पेट्रोलिंग करत होते.त्यावेळी रविवार पेठेतील मेहुणपुरा रोडवरील निधी बारमधून मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येत होता.
त्यामुळे फिर्यादी हे तेथे गेले. तेव्हा तिघे जण तेथे भांडत होते. तेव्हा आरोपी फिर्यादीला म्हणाले ” आम्ही हा कुठेही जाणार नाही , तुला काय करायचे ते कर.आम्ही तीन स्टार वाले अधिकारी खिशात घेऊन फिरतो,तु आमचे काय वाकडे करणार” असे बोलून फिर्यादीस शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून गेला.वर्दी पकडून त्यांना ढकलून दिले. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक कुंभारे तपास करीत आहेत.