पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,
वानवडी–रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात आज प्रभाग क्रमांक १८, १९ व ४१ संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते. बैठकीत उमेदवारी अर्ज प्रक्रिया, फॉर्म भरण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे तसेच निवडणूक खर्चासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की २३ ते ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा असून त्याचा दररोजचा हिशोब संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
या बैठकीत विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (दोन्ही गट), काँग्रेस पार्टी, AIMIM तसेच इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार सहभागी झाले होते.
तर काशिफ सय्यद यांनी मिंटीग मध्ये प्रश्न उपस्थित केला की, मतदानाच्या दिवशी पोलिंग बुथवर स्थानिक नागरिक बसायला हवं की बाहेरचा यावर अधिकाऱ्यांनी उत्तर देत म्हणाले की पोलिंग बुथवर स्थानिकच नागरिक बसायला हवे.
यावेळी समीर शफी पठाण यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित करत विचारले की, एखादा उमेदवार १५ लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च करत असल्यास त्यावर कोणती यंत्रणा लक्ष ठेवणार आहे व त्यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जाणार आहे? यावर उत्तर देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, खर्च मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवारावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, उमेदवारी अर्ज बाद करण्यासह नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मझहर मणियार यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रश्न उपस्थित केला.मनसेचे गोरख इंगळे यांनी परवानगी शिवाय भोंगे व एलईडी वापरून प्रचार आत्ताच पासून काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चे काही इच्छुक उमेदवार कडून प्रचार केला जात आहे या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न केला. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, परवानगीशिवाय प्रचार केल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई केली जाईल.
तसेच अमर गव्हाणे यांनी एका उमेदवाराला किती कचेऱ्या उघडता येतील तसेच मतदानाच्या दिवशी नावात बदल असल्यास आधार कार्डच्या आधारे मतदान करता येईल का,असे प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे जाबीर शेख यांनी मतदानाच्या दिवशी बूथवर पोलिंग एजंटसाठी जागेची कमतरता आणि सोयी-सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १९ मध्ये एकूण ११५ मतदान केंद्रे असून सर्व बूथवर आवश्यक व्यवस्था करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नियमांनुसार मतदानाचा हक्क दिला जाईल.
प्रभाग क्रमांक १९ मधील इच्छुक उमेदवारांनी देखील विविध सूचना व प्रश्न मांडले. सर्व प्रश्नांना निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. संपूर्ण बैठक पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
या बैठकीमुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत इच्छुक उमेदवारांना स्पष्टता मिळाली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत,नियमबद्ध व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



