पुण्यात वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली

0
Spread the love

पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी

पुणे शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी १६ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश पारित करून वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आणि चलन मशीनी जमा करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशात ३१ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.परंतु कारवाई थंडावल्याने शहरात वाहतूक नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली सुरू झाली आहे.

ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, अवजड वाहनांना बंदी असूनही त्यांना रस्त्यावर धावू देणे, काळी फिल्म असलेल्या गाड्या, एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने असे अनेक नियमभंग आता सहजपणे दिसून येत आहेत.

पूर्वी रस्त्यावर वाहतूक पोलिस दिसले की पळून जाणारे पुणेकर आता बिनधास्तपणे पोलिसांसमोर उभे राहत आहेत. कारवाई बंद झाल्याने आयुक्तांच्या आदेशाचे अनेक नागरिकांनी स्वागत केले असले, तरी याचा फायदा नियम तोडणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, वाहतूक शिस्त राखण्यासाठी कारवाई आणि जनजागृती यांचा समतोल आवश्यक आहे. पोलिस आयुक्तांनी पुन्हा कठोर कारवाईचे आदेश द्यावेत आणि चुकीचे वर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसांवरही कडक कारवाई करावी, जेणेकरून शहरात शिस्त आणि समतोल दोन्ही राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here