“पोलिसांच्या नाका खालून गुन्हेगार साबीर शेख पसार! एकही आरोपी अटक नाही,पीडितांचा संताप
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे: कोंढव्यात अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने हज-उमराह यात्रेकरूंची कोट्यवधी रुपयांची निर्लज्ज फसवणूक केली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अमीर सरदार शेख आपल्या पत्नीसह आठवडाभरापासून फरार आहे. तरीही पुणे पोलिसांची अक्षम्य नाकामी समोर आली आहे. एकही आरोपी अद्याप जेलमध्ये नाही!
७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असतानाही साबीर शेखसह सर्व भामटे पोलिसांच्या नाका खालून सहज पसार झाले. पुणे पोलिस आयुक्तालयात दररोज फसवणूक झालेल्या नागरिकांची रांग लागली आहे, पण पोलिसांचा शिंकजा या लुटारूंना अजूनही लागलेला नाही.
लालसाचा सापळा आणि निर्लज्ज लूट
अमीर शेखने “स्वस्तात हज-उमराह” या आमिषाने हजारो भाविकांना जाळ्यात अडकवले. बॅनर, जाहिराती आणि खोट्या वचनांनी लोकांना फसवले. काहींना दरमहा नफा देण्याचे लालच दाखवून ५ लाख ते २० लाख रुपये उकळले. हज यात्रा तोंडावर आल्यावर हा अमीर, त्याची पत्नी आणि साथीदार साबीर शेख कोट्यवधी रुपये घेऊन धुम ठोकून फरार झाले.
मागील बातमी वाचा }}} पुण्यातील खळबळजनक फसवणूक! कोंढव्यातील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक हज यात्रेकरूंचे कोट्यवधी रुपये घेऊन फरार
नागरिकांनी फसवणूक उघडकीस आल्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार केली, पण पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून जबाबदारी झटकली. यामुळे आरोपींना पुरेसा वेळ मिळाला आणि ते निसटले. कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला गांभीर्य दाखवले असते तर हे सर्व घोटाळेबाज आज जेलमध्ये सडत असते, असा तीव्र आरोप पीडित करत आहेत.
पुरावे नष्ट करण्यास पोलिसांची मदत?
एफआयआर दाखल झाल्यावर अमीरचे कोंढवा आणि भवानी पेठेतील कार्यालये रिकामे करण्यात आली. भवानी पेठेतील कार्यालय रिकामे करताना पोलिस घटनास्थळी उपस्थित होते, तरीही त्यांनी कोणालाही ताब्यात घेतले नाही. पुरावे नष्ट होण्यास मुक्त वातावरण मिळाले, अशी स्थानिकांची तीव्र टीका आहे.




