PUNE CITY TIMES IMPACT : शेवाळवाडीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी केतकर अखेर निलंबित!

0
Spread the love

‘पुणे सिटी टाईम्स’च्या बातमीचा दणका; थेट पोलीस आयुक्तांना जाब विचारल्यानंतर खडबडून जागी झाली खाकी, तत्काळ निलंबनाची कारवाई

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी 

पुणे : कर्तव्यावर असताना किंवा खाकी गणवेशाची शान विसरून मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर राडा घालणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला अखेर तिची जागा दाखवण्यात आली आहे. शेवाळवाडी चौकात मद्यपान करून भररस्त्यात गोंधळ घालणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी केतकर यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. ‘पुणे सिटी टाईम्स’ने हा गैरप्रकार पुराव्यानिशी समोर आणत थेट पुणे पोलीस आयुक्तांना यावर जाब विचारला होता. बातमी प्रसिद्ध होताच पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आणि वरिष्ठांनी सूत्रे हलवत तातडीने निलंबनाचे आदेश जारी केले.

भररस्त्यात घातला होता धिंगाणा!

काही दिवसांपूर्वी हडपसर-शेवाळवाडी चौकात अश्विनी केतकर या मद्यधुंद अवस्थेत नागरिकांशी वाद घालत गोंधळ घालत होत्या. रस्त्यावरील नागरिकांनी हा प्रकार डोळ्यांनी पाहिला आणि त्याचे व्हिडिओही समोर आले होते. कायद्याचे रक्षण करण्याची शपथ घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अशा प्रकारे भरचौकात दारूच्या नशेत सामान्य जनतेला वेठीस धरल्याने परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

मागील बातमी वाचण्यासाठी }}}. पुण्यात खाकीची नशा! तुकाई पोलीस चौकीतील महिला कर्मचारी रस्त्यावर ‘फुल तर्राट’; कारला नंबर प्लेटही नाही, जाब विचारणाऱ्या नागरिकांना अर्वाच्य शिवीगाळ

‘पुणे सिटी टाईम्स’ने लावून धरला विषय

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ‘पुणे सिटी टाईम्स’ने या गंभीर प्रकाराची दखल घेतली. “सामान्यांना कायद्याचे धडे देणारे पोलीस आपल्याच कर्मचाऱ्यांच्या अशा लाजीरवाण्या कृत्यावर गप्प का?” असा थेट आणि रोखठोक सवाल उपस्थित करत थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या प्रकरणाचा पाठपुरावा केला.

बातमीचा दणका; अखेर निलंबनाचे आदेश

‘पुणे सिटी टाईम्स’वर ही बातमी प्रसिद्ध होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडाली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्राथमिक चौकशीअंती अश्विनी केतकर यांच्यावर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली. शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

नागरिकांच्या हक्कासाठी आणि खाकीची पत राखण्यासाठी ‘पुणे सिटी टाईम्स’ने दाखवलेल्या या बाणेदार भूमिकेचे पुणेकरांमधून जोरदार स्वागत होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here