पुणे पोलीस दलात खळबळ! ३० लाख रुपयांची जबरी चोरी लपवून फक्त ‘बॅग हरवल्याची’ नोंद करणे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भोवले; पोलीस आयुक्तांकडून मार्केट यार्डचे वरिष्ठ पीआय विश्वजित जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी 

पुणे : मार्केट यार्ड परिसरात भरदिवसा ३० लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडल्यानंतरही पोलिसांनी लुटीऐवजी केवळ ‘बॅग हरवल्याची’ तक्रार नोंदवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल २१ दिवस या प्रकरणात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. अखेर स्वारगेट पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असता, त्यांनी या ३० लाखांच्या लुटीची कबुली दिली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड पोलिसांना अखेर लुटीचा गुन्हा दाखल करावा लागला. या गंभीर हलगर्जीपणाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप यांना तत्काळ निलंबित केले आहे.

डोळ्यांत स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली; थरारक घटनाक्रम:

ही घटना ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. मूळचे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील असलेले श्रवण शंकरलालजी देवासी (वय २२) हे मार्केट यार्डमधील ‘एस. पी. एंटरप्रायझेस’ येथे कामाला आहेत. कंपनीचे मालक राकेश परिहारिया (वय ३२) यांनी श्रवण आणि त्यांचे सहकारी गणपत हेमाराम देवासी (वय १८) यांना घरातून ३० लाख रुपयांची रोख रक्कम आणण्यास सांगितले होते. दोघेही कर्मचारी ३० लाख रुपयांची रोकड बॅगेत ठेवून अ‍ॅक्टिव्हावरून जात होते.

मार्केट यार्डमधील शिवनेरी रस्त्यावर बँक ऑफ महाराष्ट्रजवळ दोन दुचाकीस्वारांनी त्यांचा रस्ता अडवला. अ‍ॅक्टिव्हा थांबताच दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीने श्रवण आणि गणपत यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांची आणि चेहऱ्याची तीव्र जळजळ होऊ लागली व दोघेही तोल जाऊन खाली पडले.

त्याच वेळी आणखी एका दुचाकीवरून तीन आरोपी घटनास्थळी पोहोचले. या पाचही आरोपींनी ३० लाखांची बॅग हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेनंतर श्रवण यांनी तत्काळ मालक राकेश परिहारिया यांना फोन करून माहिती दिली. परिहारिया तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र, एवढी मोठी लुटीची घटना भरदिवसा घडूनही पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करण्याऐवजी केवळ बॅग हरवल्याची नोंद करून घेतल्याचे आता उघडकीस आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here