पुणे: मुस्लिम अल्पवयीन मुलाला शेण खायला लावणारी तृतीयपंथी बिपाशा मणीकम व साथीदारांवर पोक्सो आणि दरोड्याचा गुन्हा दाखल; न्यायालयाकडून कारावासात रवानगी

0
Spread the love

आंबेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

आरोपींची सोशल मीडिया पोस्ट म्हणते, ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची आम्हाला मोठी मदत!’

पुणे सिटी टाईम्स-प्रतिनिधी

पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात समाजकंटकांनी कात्रज भागात म्हशी वाहून नेणारा कंटेनर अडवला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या कंटेनरमध्ये गाई नसून म्हशी होत्या. तरीही समाजकंटकांनी तो कंटेनर आंबेगाव पोलीस ठाण्यात नेला आणि पोलीस ठाण्यासमोरच कंटेनर चालक व त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, त्यांना कुराण आणि इस्लाम धर्माबद्दल शिवीगाळ करायला लावली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि त्या अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने शेण खायला भाग पाडले.

ही बातमी ‘पुणे सिटी टाईम्स’ने प्रसिद्ध करताच सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे अजहर तांबोळी, अॅडव्होकेट ताज सिद्दिकी, दिलावर सय्यद आणि सद्दाम शेख यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांकडून तक्रार घेण्यास चालढकल केली जात असल्याचे सांगण्यात आले. मुस्लिम समाजात वाढता असंतोष पाहून पोलिसांनी अखेर स्वतःहून (सुमो टो) दखल घेतली.

याप्रकरणी १) तृतीयपंथी बिपाशा उर्फ आकाश राजू मणीकम, २) विराज सुळे, ३) हेमंत गायकवाड, ४) संग्राम जगताप आणि एका अन्य आरोपीविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १९६, २९९, ३५२, ३५१(२), ११५(२), ३, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल शिवाजीनगर न्यायालयात बिपाशाला आणि तिच्या साथीदारांना हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता, पीडित मुस्लिम युवक अल्पवयीन असल्याचे समोर आले. तसेच, त्याला अयोग्य ठिकाणी स्पर्श केल्याचे निष्पन्न झाल्याने, या गुन्ह्यात पोक्सो (POCSO) आणि दरोड्याची कलमे वाढवण्यात आली. यामुळे बिपाशा उर्फ आकाश आणि तिच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली असून, न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली आहे.

“पोलिसांनी वेळेत दखल का घेतली नाही?”

आंबेगाव पोलिसांकडे यापूर्वीही अनेक तक्रारी वारंवार येत असल्याचे बोलले जात आहे. या तक्रारींमध्ये किती तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, आरोपी विराज सुळे याने सोशल मीडियावर टाकलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, “आमचे आंबेगाव हद्दीचे ‘शरद झिने’ सर यांनी २ वर्षांत आम्हा हिंदू कार्याला जी साथ दिली आणि गोरक्षणात मनोबल वाढवण्याचे काम ते नेहमी करत असतात, त्याबद्दल आम्ही सकल हिंदू समाजाकडून त्यांचे आभार मानतो. अशा धर्मकार्याच्या माणसांना तुमच्यासारख्याची साथ लाभू दे. आपला नम्र…”

या पोस्टवरून अशा गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांचे पाठबळ असल्याचे दिसून येते. पोलीस कधीपासून समाजकंटकांना संरक्षण देऊ लागले आहेत, असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

“आमदार अबू आझमींनी अधिवेशनात आवाज उठवला आणि यंत्रणा कामाला लागली”

घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, त्या संदर्भात आमदार अबू आझमी यांनी अधिवेशनात आवाज उठवला. मुख्यमंत्री यावर कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार केला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार गोरक्षणाच्या नावाखाली दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना आवर घालणार का?

गोरक्षणाच्या नावाखाली पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या बिपाशा उर्फ आकाश मणीकम आणि तिच्या टोळीचा (चिल्लर पार्टी) पोलीस आयुक्त अधिक तत्परतेने तपास करून, त्यांची माहिती जमा करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार का? कारण गोरक्षणाच्या नावाखाली लुटमार करणे, मारहाण करणे, जातीवाचक बोलणे, शिवीगाळ करणे अशा अनेक प्रकारांची चर्चा कात्रज भागात ऐकायला मिळते. यांना पैसे कोण पुरवते? जामिनासाठी कोण पाठपुरावा करते? त्यांना आर्थिक रसद कुठून मिळते? याचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आम जनतेला वेगळा न्याय आणि गोरक्षकांना वेगळा न्याय का?

एखाद्या ठिकाणी किरकोळ कारणावरून भांडण किंवा तोडफोड झाली, तर पोलीस आरोपींची धिंड काढतानाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांना देऊन मोठे काम केल्याचे दाखवतात. मात्र, बिपाशा उर्फ आकाश मणीकमसारख्या आरोपींना पिंजरा गाडीत न नेता पोलीस जीपमध्ये नेले जाते आणि त्यांची धिंडही काढली जात नाही. मग पोलीस खरोखरच निष्पक्ष आहेत का? अशी चर्चाही जोरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here