कोंढव्यात ९ मजली बेकायदेशीर इमारतीचा प्रताप; नागरिकांचा जीव धोक्यात, भाजप अल्पसंख्याक मोर्चाची कारवाईची मागणी

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुणे: कोंढवा भागात बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच, काही विशिष्ट बांधकामांकडे अधिकारी सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. कोंढव्यातील शिवनेरी नगर, गल्ली नंबर १ मधील एका अरुंद बोळात जाफर पठाण नावाच्या बिल्डरने तब्बल ९ मजल्यांची बेकायदेशीर इमारत उभी केल्याचे समोर आले आहे.

‘प्रशासनाचे डोळे झाकले होते का?’

या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे पुणे शहर सरचिटणीस हाजी इसहाक पानसरे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. “एवढा मोठा ‘ताजमहाल’ उभा राहीपर्यंत पालिकेचे अधिकारी डोळे मिटून बसले होते का?” असा संतप्त सवाल पानसरे यांनी उपस्थित केला आहे.

धोकादायक बांधकाम आणि सुविधांचा अभाव
पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीचे बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. इमारतीबाबत त्यांनी खालील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत:

निकृष्ट दर्जा: बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे.

सुविधांचा अभाव: रहिवाशांसाठी पिण्याचे पाणी आणि ड्रेनेजची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

अग्निशमन यंत्रणेचा अभाव: इमारतीत फायर सेफ्टी सिस्टीम नाही. अरुंद गल्लीमुळे आग लागल्यास अग्निशमन दलाची गाडी पोहोचणेही अशक्य आहे.

नागरिकांची फसवणूक: नियमांचे उल्लंघन करून घरे विकली जात असल्याने, यात केवळ घर खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांचेच आर्थिक आणि जीवित नुकसान होणार आहे.

मोठ्या घोटाळ्याचा संशय

या संपूर्ण प्रकरणात मोठे ‘आर्थिक हितसंबंध’ जपले गेल्याचा संशय पानसरे यांनी व्यक्त केला आहे. या बेकायदेशीर बांधकामाचा पर्दाफाश करण्यासाठी लवकरच सविस्तर पुराव्यांसह पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आता या तक्रारीनंतर महापालिका प्रशासन या ९ मजली इमारतीवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here