सद्दामच्या बेकायदेशीर टोलेजंग इमारतीवर हातोडा कधी?
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे: कोंढवा अश्रफ नगरातील अली मस्जिदच्या लगत सद्दाम नावाच्या बिल्डरने बेकायदेशीरपणे ७ मजली टोलेजंग इमारत उभी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या मते, मस्जिदच्या जवळ बेकायदेशीर बांधकाम सुरू असताना ना मस्जिद व्यवस्थापनाने ना महापालिकेने कोणतीही कारवाई केली. बांधकाम करताना सर्व नियम धुडकावून टाकण्यात आले. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.

नागरिक म्हणतात, “सद्दामसोबत एक मौलाना (मागील काळात एमआयएम पक्षाशी संबंधित) भागीदार असल्याने त्यांनी पक्षीय दबाव आणि पोलिस प्रशासनाची भीती दाखवून हे बांधकाम पूर्ण केले. ही इमारत कोसळल्यास जबाबदारी कोणाची? मौलानाची, सद्दामची, महापालिकेची की पोलिसांची?”

महापालिकेची भूमिका:
या बाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्वरित नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीने कारवाई करण्याचे नियोजन आहे. आमच्यावर कोणताही दबाव नाही. नागरिकांनी बेकायदेशीर बांधकामाबाबत महापालिकेकडे तक्रार करावी.”

रॉयल्टी बुडवल्याचा आरोप:
बांधकामासाठी खोदकाम करताना निघालेल्या माती, डबर आणि खडक यावर जिल्हाधिकाऱ्यांची रॉयल्टी आकारली जाते. मात्र सद्दामने ७ ते ८ लाख रुपयांची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
नागरिकांची मागणी:
तातडीने बेकायदेशीर इमारतीवर कारवाई करावी.
दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
भविष्यात अशा प्रकारच्या दुजाभावाला आळा बसवावा.
या प्रकरणी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासनाकडून लवकरात लवकर स्पष्ट भूमिका आणि कृती अपेक्षित आहे.




