पुणे : शिक्षणाच्या माहेरघरात भ्रष्टाचाराचा कळस! शिवाजीनगर येथील तलाठी आणि कोतवालाचे १० लाखांचे लाच प्रकरण, तर अशा कितीतरी घटना घडत असतील याची चौकशी होणार का?

0
Spread the love

पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी

पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असले तरी आज महसूल खात्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. तलाठ्यांकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी १००-२०० रुपये घेतले जात असल्याचा पुणेकरांचा अनुभव असला तरी ही कीड खूप मोठी आहे. काल शिवाजीनगर येथील महिला तलाठी व कोतवाल यांच्याविरोधात १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असली तरी आज संपूर्ण पुणे शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही बांधकाम व्यावसायिक परवानगी घेऊन कामे करतात, तर काही विनापरवाना. यात फायदा होतो तलाठी, मंडळ अधिकारी आणि त्यावरील वरिष्ठांचा. तुम्ही विचार करत असाल कसे?

एखाद्या बांधकाम साइटला नियमानुसार तहसीलदारांना ५०० ब्रास, प्रांताधिकाऱ्यांना ५०१ ते २,००० ब्रास आणि जिल्हाधिकाऱ्यांना २,००१ ते २५,००० ब्रास पर्यंत परवानगी देण्याचे अधिकार आहेत.
जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना पाहणी व चौकशी करण्याचे अधिकार आहेत.

याचाच गैरफायदा घेत थेट जाऊन पाहणी केली जाते. तेथे परवानगीपेक्षा जास्त उत्खनन किंवा परवानगीची मुदत संपल्यानंतरही गौण खनिज उत्खनन चालू असेल, तर मग सुरू होते भ्रष्टाचाराची ‘गेम’ आणि बांधकाम व्यावसायिकांची ब्लॅकमेलिंग. तलाठी व मंडळ अधिकारी स्वतः मोजणी करून बांधकाम व्यावसायिकाला सांगतात, “पंचनामा झाला आहे. यात परवानगीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन झाले आहे. त्यावर तुम्हाला एवढा दंड भरावा लागेल, किंवा दंड भरला नाही तर तुमच्या ७/१२ वर बोजा चढवला जाईल.”

या भीतीपोटी बांधकाम व्यावसायिक तडजोडीला बसतो आणि मग फसतो. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना मलाई मिळते. कधी त्या संदर्भात कोणी तक्रार केली असेल, तर तलाठी-मंडळ अधिकारी तक्रारदाराला खोटी माहिती देऊन मोकळे होतात. कधी तक्रारदार खमक्या असेल, तर बांधकाम व्यावसायिकाला सांगितले जाते किंवा क्वचित तहसीलदारांची दिशाभूल करून खोटी माहिती दिली जाते. तक्रारदाराचा तगादा चालूच असेल, तर क्वचित प्रकरणे तहसीलदारांकडे सुनावणीला ठेवली जातात आणि तलाठी-मंडळ अधिकारी सिनेमातील पुष्पासारखे ‘सेफ’ होऊन जातात. तो पुष्पा चंदनाच्या झाडांची चोरी करायचा, तर महसूल खात्यातील हे गौण खनिज उत्खनन चोर ‘पुष्पा’ नाव ठेवल्यास वावगे ठरणार नाही. क्रमशः

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या पुष्पावती आणि पुष्पा मुंढे फरार आहेत..

पुण्यासारख्या शहरात असे प्रकार घडत असल्याने किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, ते दिसून येते. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून क्लार्कपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत सगळेच गलेलठ्ठ झाले आहेत. नुकसान होत आहे फक्त शासनाचे. महसूल मंत्र्यांनी पुण्यातील सर्व गौण खनिज उत्खननाची तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी सजग पुणेकरांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here