लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला; ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चा तीव्र निषेध, आंदोलनाचा इशारा
पुणे सिटी टाईम | पुणे:
कोंढवा-कौसरबाग (प्रभाग क्र. १९) येथील नगरसेवक गफूर अहमद पठाण पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका बातमीचा राग मनात धरून पठाण यांनी पत्रकारांना फोनवरून आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ करत थेट कार्यालय तोडफोड करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे शहरातील पत्रकार वर्तुळात तीव्र संतापाची लाट उसळली असून, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेने याचा जाहीर निषेध केला आहे.
नेमके प्रकरण काय?
दोन-तीन दिवसांपूर्वी नगरसेवक गफूर पठाण यांच्या कार्यकर्त्यांकडून एका महिला कामगाराला बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचे वास्तव एका पत्रकाराने बातमीच्या माध्यमातून समोर आणले. याचाच राग मनात धरून गफूर पठाण यांनी संबंधित पत्रकाराच्या मित्राच्या फोनवरून सर्वच पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. इतक्यावरच न थांबता, “पत्रकारांची कार्यालये फोडून टाकू,” अशी उघड धमकीही त्यांनी दिली.

लोकप्रतिनिधी की हुकूमशहा?
कोंढव्यातील विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये नाव आल्यानंतर बातम्या प्रसिद्ध झाल्यास, पठाण आणि त्यांचे कार्यकर्ते बातम्या डिलीट करण्यासाठी पत्रकारांवर दबाव आणतात. “बातम्या न हटवल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू,” अशा धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप पत्रकारांकडून होत आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारची भाषा वापरणे म्हणजे सत्तेचा माज असून, लोकशाहीत हुकूमशाही गाजवण्याचा हा प्रकार असल्याची टीका नागरिक आणि पत्रकारांमधून होत आहे.
पत्रकार संघटना आक्रमक
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या या प्रकाराची दखल ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेने घेतली आहे. संघटनेने नगरसेवक गफूर पठाण यांच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला असून, याप्रकरणी लवकरच तीव्र आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.




