तहसीलदारांकडून गुन्ह्याची माहिती दाबण्याचा प्रयत्न
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे : मार्केटयार्ड गंगाधाम चौक, सर्वे नंबर ५७९, ५८०, मौजे बिबवेवाडी येथे स्टार कन्स्ट्रक्शन हिलव्ह्यू परसेप्शन रिॲलिटीकडून गौण खनिज उत्खनन सुरू होते. नियमानुसार परवानगी घेतली असतानाही बेकायदेशीर पद्धतीने टेकडी फोडण्याचे काम केल्याने ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.बेकायदेशीरपणे रात्री दोन वाजता गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे पुरावे पुणे सिटी टाईम्सने तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवले होते. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने पुणे सिटी टाईम्सने पुराव्यांनिशी व्हिडिओ प्रसारित करून पुणे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांना थेट प्रश्न विचारले – “कारवाई होणार का?”
या प्रश्नांनंतर शनिवारी यंत्रणा सक्रिय झाली. काम थांबवण्याचे आदेश पारित करण्यात आले आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात संजय मेहता तसेच अमित ललावणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तहसीलदारांकडून गुन्ह्याची माहिती लपवण्याचा प्रयत्न
स्टार कन्स्ट्रक्शन हिलव्ह्यू परसेप्शन रिॲलिटीविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुणे सिटी टाईम्सला मिळाली. सोमवारपासून प्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू केला.तहसीलदार स्मिता मोरे यांना फोन केला असता फोन उचलला गेला नाही. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून माहिती मागितली असता “थोड्या वेळाने कळवते” असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. पुन्हा प्रयत्न केला असताही त्यांनी उत्तर देणे टाळले.याबाबत प्रांताधिकारी विठ्ठल जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “तुम्ही तहसीलदारांशी बोलून घ्या. मी त्यांना माहिती देण्याचे सांगितले आहे.” मात्र प्रांताधिकारी जोशी यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.
अखेर पुन्हा प्रांताधिकारी जोशी यांना संपर्क करून एफआयआरची माहिती आणि गुन्हा दाखल झाल्याची कागदपत्रे मागितली असता त्यांनी पुन्हा तहसीलदार स्मिता मोरे यांच्याकडे निर्देशित केले. जोशी यांच्या सांगण्यावरून स्मिता मोरे यांना फोन केला असता त्यांनी तीनही वेळा फोन उचलला नाही. व्हॉट्सअॅपवर मेसेज करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली.ही टाळाटाळ संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठी केली गेली असावी, असा संशय आता बळावला आहे. क्रमशः




