पुणे : पुनीत बालन यांच्या बेकायदेशीर जाहिरातींवरील ३ कोटी २० लाख दंड वसुलीकडे पालिकेचे सुस्पष्ट दुर्लक्ष!

0
Spread the love

२ वर्षे ११ महिने उलटले तरी आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई नाही

सामान्य जाहिरातदारांवर कारवाई, माणिकचंद ॲक्सिरिचबाबत मात्र ‘तेरी चुप, मेरी भी चुप’

दंडावर दंड किती वसूल झाला, हेही गूढ!

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

एखाद्या सामान्य नागरिकाने किंवा छोट्या जाहिरातदाराने बेकायदेशीर जाहिरात लावली, की पालिकेचा आकाश चिन्ह परवाना विभाग खळबळून जागा होतो. दंड ठोठावतो, कधी कधी फौजदारी गुन्हाही दाखल करतो. पण पुनीत बालन यांच्या माणिकचंद ॲक्सिरिच कंपनीच्या बेकायदेशीर जाहिरातींच्या प्रकरणात मात्र हाच विभाग कुंभकर्णाची झोप घेत असल्याचे चित्र आहे.

माणिकचंद ॲक्सिरिच कंपनीने सदाशिव पेठ, नारायण पेठ, बाजीराव रोड, टिळक रोड, गंज पेठ, शनिवार वाडा परिसर, कसबा पेठ, भवानी पेठ आणि शहराच्या इतर भागांत राजरोसपणे जाहिराती लावून शहर विद्रूप केले होते.

याबाबत तत्कालीन उपायुक्त माधव जगताप यांनी आकाश चिन्ह परवाना निरीक्षकांना कामाला लावून संपूर्ण माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२३ रोजी उपायुक्त माधव जगताप यांच्या सहीने पुनीत बालन यांना ३ कोटी २० लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर ‘रात गई, बात गई’ अशी स्थिती झाली. पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

आज जवळपास ३ वर्षे होत आली तरी या ३ कोटी २० लाख रुपयांच्या दंडाबाबत फक्त तोंडी चौकशी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पुणे सिटी टाईम्सला मिळाली आहे. सर्वसामान्य लोकांवर गदा आणणारे पालिका अधिकारी या मोठ्या दंडाच्या वसुलीकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे पालिकेची तिजोरी रिकामी झाल्याची बोंबाबोंब आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या रकमेच्या वसुलीकडे कानाडोळा, ही अवस्था चिंताजनक आहे.माधव जगताप यांच्या नोटीसांपलीकडे काहीच घडले नाही.

पालिकेतील सूत्रांच्या मते, ही फाईल आता बंद करण्यात आली असून अधिकारी हातावर हात ठेवून बसले आहेत. कोणी विचारणा केली तर “वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे” असे सांगून दिशाभूल केली जाते. माधव जगताप यांच्यानंतर आणखी किती नोटीसा काढल्या गेल्या, याबाबत मात्र अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे. “नोटीस काढण्याची हिंमत फक्त माधव जगताप यांच्याकडेच होती का?” असा प्रश्न सजग पुणेकर विचारत आहेत.

आकाश चिन्ह परवाना उपायुक्तांनाही माहिती नाही

सध्याचे उपायुक्त संदीप कदम यांना संपर्क साधला असता त्यांना पुनित बालन यांना ३ कोटी २० लाखांची नोटीस बजावली होती २ वर्ष ११ महिने झाले अद्यापही दंडाची वसुली का करण्यात आलेली नाही.. केली असेल तरी कधी व किती आणि अद्याप पर्यंत दंडावर दंड किती लागले आहेत याची माहिती मागितली असता त्यांना याबाबत माहिती नसल्याचे व “माहिती घेऊन कळवतो” असे सांगून त्यांनी फोन कट केला.

दुसरीकडे, पुनीत बालन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, त्यांना बजावलेली नोटीस चुकीची असून फक्त २५ लाख रुपये भरायचे आहेत. या दाव्यावरही पालिका आयुक्त किंवा आकाश चिन्ह विभागाने कोणतीही स्पष्ट कारवाई केलेली नाही. सामान्य जाहिरातदारांवर कडक कारवाई करणारी यंत्रणा मोठ्या व्यापाऱ्याबाबत मात्र का गप्प आहे, हा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे. क्रमशः 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here