पालिकेच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून पालिका कोर्टातून स्टेचा खेळ!
वर्षानुवर्षे बेकायदेशीर ताबा अन् भाईजी मालामाल
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढवा येथील कौसरबाग सोसायटीच्या बाजूने १० सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बेकायदेशीर बांधकाम करून मलाई लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सन २०१५ पासून आजपर्यंत बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण करून ते भाड्याने देऊन दरमहा लाखो रुपयांचा मलिदा खाल्ला जात असताना पालिका अधिकारी-कर्मचारी मात्र मुकाट्याने सर्व पाहून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ म्हणत बसलेले आहेत.
कौसरबाग सोसायटी अस्तित्वात आल्यानंतर व बांधकाम व्यावसायिकाने एफएसआय घेतल्यानंतर तसेच ओसी (Occupancy Certificate) मिळण्यापूर्वी मनपाकडे ॲमेनिटी स्पेसची जागा ताब्यात द्यावी लागते. परंतु सदरील बांधकाम व्यावसायिकाने अशी कोणतीही जागा पालिकेच्या ताब्यात दिली नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे.
सदरील जागा पालिकेच्या ताब्यात न दिल्याने २०१५ पासून पालिकेच्या जागेवर फुकटात लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांना काही देणे-घेणे नाही. कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, मुख्य अभियंता, मालमत्ता व्यवस्थापन विभाग व पुणे महानगरपालिका आयुक्त सगळेच या प्रकरणी झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत.
पुणे मनपा बांधकाम विकास विभागाने २९ मार्च २०२२ रोजी सदरील ॲमेनिटी स्पेस जागेत अतिक्रमण व बांधकाम केल्या प्रकरणी नोटीस काढली होती. त्या नोटिशीच्या आधारे पालिकेने कोर्टात याचिका दाखल करून सदरील जागेवर कोर्टाने स्टे दिला आहे. परंतु स्टे असताना सदरील जागेत नवीन बांधकाम किंवा रिनोव्हेशन करता येत नाही. तरीही सुमारे नऊ महिन्यांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांनी तेथे रिनोव्हेशन करून घेतले.
यासंदर्भात नागरिकांनी कनिष्ठ अभियंता (बांधकाम विभाग, झोन ५) सोपान रूपनार यांच्याकडे तक्रारी केल्या असता त्यांनी सदरील ठिकाणी काम थांबविण्याची साधी नोटीसदेखील काढली नाही. तर केलेल्या तक्रारींकडे सुस्पष्ट दुर्लक्ष केल्याचे पुरावे आहेत.
जागा पालिकेची, कमाई बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांची आणि डल्ला पालिकेच्या तिजोरीवरच? असे प्रकार घडत असताना उच्च न्यायालयाने पालिका अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. क्रमशः
ॲमेनिटी स्पेसच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम आणि स्टेचा खेळ!
बेकायदेशीरपणे बांधकाम करायचे आणि पालिकेचे अधिकारी सोपान रूपनार यांनी नोटीस धाडायची अन् पालिका कोर्टातून स्टे आणायचा, असा खेळ सध्या कौसरबागमध्ये चालू आहे. ॲमेनिटी स्पेस जागेत मोजक्या लोकांनाच स्टे मिळाला आहे. परंतु काहींनी तक्रारी किंवा माहिती अधिकारात माहिती विचारली की सगळ्या जागांवर स्टे असल्याचे सांगून सोपान रूपनार मोकळे होत असल्याचा आरोप होत आहे.
स्टे मिळतोच कसा?
पालिका अधिकारी सोपान रूपनार यांनी नोटीस बजावल्यानंतर २४ तासांत कारवाई होणे बंधनकारक आहे. परंतु कदाचित साटेलोटे असल्यानेच रूपनार कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने १५ दिवसांच्या आत स्टे मिळतो. तर कौसरबाग परिसर सोडला तर दुसऱ्या बांधकाम अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर बांधकामाला नोटीस दिल्यानंतर २४ तासांत बांधकामांवर धडाकेबाज कारवाई केली जाते. दोन्ही ठिकाणी कनिष्ठ अभियंता हेच पद, परंतु दोघांच्या कामात फरक कोंढवाकरांना दिसू लागला आहे.
पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम जागा कधी ताब्यात घेणार?
कौसरबाग सोसायटीच्या बांधकामानंतर पालिकेच्या ताब्यात ॲमेनिटी स्पेसची जागा अद्यापही नाही, हे माहिती अधिकारातून समोर आले आहे. एफएसआय घेऊनही जागा ताब्यात नसल्याने पालिका आयुक्त सदरील जागा तात्काळ ताब्यात घेण्याचे पाऊल उचलणार का? असा प्रश्न कोंढवाकरांनी विचारला आहे.
क्रमशः
(पुढच्या बातमीत कुठे-कुठे स्टे आहे, याचा पोलखोल नक्कीच वाचा)




