दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ दिसताच दंडाचा बडगा; मग रिक्षा-जीपमधील जीवघेणी कोंबणूक पोलिसांना दिसत नाही का?

0
Spread the love

कात्रज चौकात भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांचा दुटप्पी कारभार; ‘हप्तेखोरी’मुळे अवैध प्रवासी वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

पुणे शहरात बेशिस्त आणि नियमबाह्य वाहतुकीमुळे सर्वसामान्य पुणेकरांचा जीव टांगणीला लागला आहे. वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षा आणि खासगी वाहनांतून खुलेआम अवैध प्रवासी वाहतूक सुरू असताना, पोलीस मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे विदारक चित्र आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या कात्रज चौकात नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची अहोरात्र मोठी ये-जा असते. याच चौकात वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत नियम पायदळी तुडवून बेकायदा रिक्षा आणि जीप वाहतूक सुरू आहे. मात्र, मिळणाऱ्या ‘मलिद्या’मुळे पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचा उघड आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

एखाद्या दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ दिसताच तत्परतेने पावती फाडणारे पोलीस, किंवा नो-पार्किंगमध्ये चुकून उभी राहिलेली गाडी उचलून ‘सिंघम स्टाईल’ अरेरावी करणारे वाहतूक कर्मचारी अवैध वाहतुकीवर मात्र पूर्णपणे ढिम्म का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

नियमानुसार तीन प्रवाशांची क्षमता असलेल्या रिक्षात चालकासह तब्बल सात जणांची जीवघेणी कोंबणूक केली जात असल्याचे ठोस पुरावे ‘पुणे सिटी टाईम्स’च्या पाहणीत समोर आले आहेत. तसेच खासगी जीपमधूनही बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक सुरू असून, याला भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांचेच मूक संमतीचे ‘अभय’ असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष चौकात वाहतूक सुरळीत करण्याऐवजी झाडाखाली सावलीत बसून केवळ नाममात्र हजेरी लावताना आढळले. परिसरातील व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बीटमधील काही विशिष्ट पोलिस अंमलदार लक्झरी बसेस, हॉटेल व्यावसायिक, भंगार विक्रेते, काँक्रीट मिक्सर आणि अवजड वाहनांसह रिक्षा-जीप चालकांकडून दरमहा मोठी ‘माया’ गोळा करत आहेत.

या संपूर्ण बेकायदेशीर वसुली आणि मनमानी कारभाराचे भक्कम पुरावे ‘पुणे सिटी टाईम्स’ने जमा केले असून, यासंदर्भात थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोमवारी रीतसर तक्रार व पुरावे सादर केले जाणार आहेत. (क्रमशः) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here