पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकावर जीवघेणा दबाव; अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र घबराट, आयुक्त नवल किशोर राम यांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुणे : शहरातील बेकायदेशीर होर्डिंग आणि फ्लेक्सविरोधात पुणे महापालिकेकडून धडक मोहीम राबवली जात असताना, वाघोली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील ८ अनधिकृत होर्डिंग पाडण्याची कारवाई सुरू असताना, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या निरीक्षकाच्या थेट कानपट्टीवर पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निरीक्षकावर थेट पिस्तूल रोखणाऱ्या संबंधित व्यक्तीचे नाव ‘सातव’ असल्याचे समोर आले आहे. भरदिवसा शासकीय कामात अडथळा आणत थेट शस्त्राचा धाक दाखवल्याने महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले वाघोलीत?
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या वाघोली भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर होर्डिंग उभारण्यात आले आहेत. यातील ८ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. कारवाई सुरू असतानाच ‘सातव’ नामक व्यक्तीने तिथे येत थेट पथकातील निरीक्षकाच्या कानपट्टीवर पिस्तूल लावले. अचानक घडलेल्या या जीवघेण्या प्रकारामुळे कारवाई करणाऱ्या पथकाची एकच धांदल उडाली.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण
या घटनेचे पडसाद संपूर्ण पुणे महापालिकेत उमटले असून, सर्वच विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. “वरिष्ठ पातळीवरून बेकायदेशीर होर्डिंगवर धडक कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले जातात; मात्र प्रत्यक्ष मैदानात उतरून जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस पोलीस संरक्षण दिले जात नाही,” अशी तीव्र भावना महापालिका कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
आयुक्त नवल किशोर राम दखल घेणार का?
या धक्कादायक प्रकारानंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत:
बेकायदेशीर होर्डिंग पाडण्याचे आदेश देणारे प्रशासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाची हमी घेणार का?
महापालिका आयुक्त नवल किशोर राम या गंभीर घटनेची दखल घेऊन संबंधित गुंडावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करणार का?
की पुरेशा पोलीस बंदोबस्ताविना अधिकारी व कर्मचाऱ्यांना असेच ‘मरण्यासाठी रस्त्यावर’ सोडले जाणार?
आता या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात काय गुन्हा दाखल होतो आणि महापालिका आयुक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणता ठोस निर्णय घेतात, याकडे संपूर्ण पुणे शहराचे लक्ष लागले आहे.




