पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,
पुण्यातील एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका जुगाराचा धंदा करणाऱ्याशी आर्थिक हितसंबंध ठेवणाऱ्यांना आता चांगलेच महागात पडले आहे. नेहमीप्रमाणे “चोर-पोलिस मैत्री”चे प्रसंग ऐकायला मिळतात; पण यावेळी थेट अवैध धंदेवाल्याशी आर्थिक देवाणघेवाण करणारे दोन पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांची नावे अशी – हवालदार शुभम जयवंत देसाई आणि पोलिस नाईक अभिनव बापुराव लडकत.गुन्हे उघडकीस आणण्याऐवजी गुन्हेगारांशी “मैत्रीपूर्ण संबंध” ठेवणे, हे त्यांचे छुपे कामकाज असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

१७ नोव्हेंबर रोजी समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने नागेश्वर मंदिराजवळ औदुंबर अर्जुन सोनावणे (वय ६५) याला मटका जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. तपास पुढे सरकला तसतसे “मटक्याची दोरी” थेट सोमवार पेठेतील बाळा उर्फ प्रविण चव्हाण याच्यापर्यंत पोहोचली.
बाळा चव्हाणला वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्याचा मोबाईल जप्त करून तपासला असता, त्यात निलंबित दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांशी सातत्याने होणारे संपर्क आणि आर्थिक व्यवहार आढळून आले. यानंतर पोलिस उपायुक्त (झोन-१) निखिल पिंपळे यांनी तात्काळ या दोघांना निलंबित केले.



