भवानी पेठेत विना टेंडर कामे ? पथविभागाकडून वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ

0
Spread the love

नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी नाही; ज्येष्ठांना व शालेय विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी,

पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जुना मोटार स्टँड ते रांका हॉस्पिटल या रस्त्याचे पथविभागाकडून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम केजीएन कन्स्ट्रक्शन (जमीर, रज्जाक) आणि कुंश कन्स्ट्रक्शन यांच्याकडून धनगर नावाच्या व्यक्तीच्या देखरेखीखाली चालू आहे. काम सुरू झाल्यापासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

 

ठेकेदारांनी शासकीय नियमांची पायमल्ली केली आहे. नियमानुसार ठेकेदाराचे नाव, कोणत्या खात्याकडून काम मंजूर आहे, वर्क ऑर्डर क्रमांक, टेंडर क्रमांक, कामाचा कालावधी, एकूण खर्च आदी माहिती असलेला बोर्ड लावणे बंधनकारक असताना केजीएन आणि कुंश कन्स्ट्रक्शनने हा नियम धाब्यावर बसवला आहे.

स्थानिकांचा आरोप करतात की, हे काम विना टेंडर देण्यात आले आहे. पथविभागाच्या संबंधित कनिष्ठ अभियंता (जेई) देवेंद्र राजपूत यांना पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधीने वर्क ऑर्डरची प्रत मागितली असता “आज देतो, उद्या देतो, मी बाहेर आहे, ऑफिसला गेल्यावर देतो, आता माझ्याकडे नाही, असिस्टंटकडून घेऊन पाठवतो” असे सांगून टाळाटाळ केली. गुरुवारी पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी थेट “आता माझ्याकडे नाही” असे सांगितले. बोर्ड लावला आहे का, असा प्रश्न विचारला असता “लावलाय, फोटो पाठवतो” असे सांगितले; पण चार दिवस उलटूनही फोटो आले नाहीत.
या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी लवकरच पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास हे प्रकरण आणले जाणार आहे.

रॉयल्टी भरली नाही; तहसीलदारांकडे तक्रार दाखल

रस्त्याचे काम करताना माती, डब्ल्यूएमएम, गट्ट आदि साहित्य वाहून नेले जाते. नियमानुसार तहसीलदारांकडून रॉयल्टी भरून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र या ठेकेदाराने अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत तहसीलदार स्मिता माने यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून त्वरित पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कामाची गुणवत्ता संशयास्पद; थर्ड पार्टी तपासणीची मागणी

परिसरातील नागरिकांमध्ये या कामाची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याची चर्चा आहे. काम खरोखरच कमी-जास्त झाले आहे की नाही, याची चौकशी व्हावी यासाठी सदर कामाची थर्ड पार्टी इन्स्पेक्शन (तपासणी) करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here