पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढवा – दिवसेंदिवस कोंढव्यात सिमेंटची जंगले वाढत असताना पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बेपर्वाईने दुर्लक्ष करत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना मोकळे रान देत असल्याचे चित्र दिसत आहे.कोंढवा खुर्द येथील भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक १५ मध्ये केवळ ५ फूट रुंद रस्त्यावर नदीम गोलंदाज या बिल्डरने ८ मजली बेकायदेशीर इमारत उभी केली आहे. तरीही पालिका प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. भाईगिरीच्या जोरावर हे बांधकाम पूर्ण करण्याच्या मार्गावर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

५ ते ७ फूट रुंद रस्त्यावर ८ मजली इमारत उभी करण्याचा प्रकार फक्त कोंढव्यातच शक्य असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.पुणे सिटी टाईम्सने मागील आठवड्यात याबाबत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर बिल्डरने तात्काळ बांधकाम बंद ठेवले होते. मात्र, नंतर “भाई-मामू” म्हणत काहींनी काम चालू ठेवण्यास सांगितल्याचे आणि “काही होणार नाही, आम्ही बघून घेऊ” असे आश्वासन दिल्याचे गोलंदाजने काम सुरू ठेवले. यावेळी त्याने “अधिकारी माझ्या खिशात आहेत” असा लोकांसमोर दावा केला.
मागील बातमी वाचा }} “५ फुटाच्या गल्लीत ८ मजली ‘टोलेजंग’ इमारत! कोंढवा खुर्दमध्ये बिल्डरचा बेकायदेशीर पराक्रम”

पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बेकायदेशीर बांधकामाबाबत विचारणा केली असता, त्यांनी “आज-उद्या नोटीस बजावून दोन दिवसांत कारवाई करण्यात येईल” असे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कोंढवा पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी केली असून, नदीम गोलंदाजचे बांधकाम तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली आहे. आता कोणते राजकीय नेते (माननीय) यात हस्तक्षेप करून अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, हे लवकरच स्पष्ट होईल, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.




