१२०० चौरस फुटाच्या जागेत अवघ्या ६ महिन्यात उभी केली ८ मजली इमारत; पालिका, महसूल आणि पोलिसांचे दुर्लक्ष?
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढवा (पुणे): कोंढवा खुर्द भाग्योदय नगर, गल्ली क्रमांक १५ मध्ये एका बिल्डरने बेकायदेशीरपणे ८ मजली इमारत उभी केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अंदाजे १२०० चौरस फुट जागेत नदिम गोलंदाज या बिल्डरने अवघ्या ६ महिन्यांत ही टोलेजंग इमारत बांधली. या बांधकामासाठी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती.

स्थानिक नागरिकांच्या मते, या गल्लीची रुंदी फक्त ५ ते ६ फूट आहे. अशा अरुंद गल्लीत सामग्री कशी आणली गेली आणि ८ मजले कसे बांधले, हे आश्चर्याचा विषय आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने संपूर्ण इमारत धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्य मुद्दे:
पालिका परवानगीशिवाय बांधकाम
गौण खनिज उत्खनन करताना जिल्हाधिकाऱ्यांचा महसूल बुडवला गेल्याचा आरोप
अरुंद गल्लीत भव्य इमारत उभी राहिल्याने रहिवाशांच्या जीविताला धोका
बेकायदेशीर बांधकामांवर मोफा अंतर्गत कारवाई का नाही?
बेकायदेशीर बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून घरे विकली जातात. स्वस्त भाव पाहून नागरिक घर खरेदी करतात, पण नंतर भिंतींमधून गळती, दुरुस्तीचे मोठे खर्च येतात. अशा फसव्या बिल्डरांवर मोफा (Maharashtra Ownership Flats Act) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

या प्रकरणी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “अशा बेकायदेशीर बांधकामांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा इमारतींमधील फ्लॅट्स खरेदी करू नयेत आणि फसवणूक टाळावी.”





