पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
लोकसभेच्या उमेदवारांमधील आरोप प्रत्यारोपच्या फैरी कमी झाल्या असल्या तरी आज वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा वाद अजूनही सुरूच असल्याचे पाह्यला मिळत आहे. AIMIM चे लोकसभा उमेदवार अनिस सुंडके यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ९६६/१ रविवार पेठ, लक्ष्मी रस्त्यावरील मालमत्ता ही वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचा आरोप केला होता.

त्यावेळी स्वतः तक्रारदार रिहान शेख हे देखील उपस्थित होते. ऐण निवडणूकीच्या तोंडावरच असे आरोप झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू झाले. त्यात अनिस सुंडके यांनी लगेच दुसरी पत्रकार परिषद घेऊन तक्रारदार रिहान शेख यांनी सदरील मालमत्तेवर वक्फ बोर्डाने त्वरित काम थांबविण्याचे आदेश दिले असल्याचे पुरावे सादर केले होते.

तरी देखील काम चालू असल्याचे व पुणे महानगर पालिका आयुक्तांच्या निदर्शनास रिहान शेख यांनी आणून दिल्यानंतर आज दि.१६ मे २०२४ रोजी पुणे महानगर पालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी तात्काळ काम थांबविण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
त्या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत सिटी सर्व्हे नंबर ९६६/१ या मालमत्तेमध्ये चालू असलेले काम ताबडतोब थांबविण्यात येऊन आपल्या कार्यालया मार्फत देण्यात आलेले कमेंटसमेंट सर्टिफिकेट सीसी/ १५४२/१९ हे रद्द करणे बाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.या संबंधित करण्यात आलेल्या कार्यवाही बाबत या कार्यालयास अवगत करण्याचे कळविले आहे.
सदरील मालमत्ता ही आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी व मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे व उत्कर्ष असोसिएटसचे नावे आहे. सदरील मालमत्ता ही अंदाजे २०० कोटींची असल्याचे बोलले जात आहे. यात आता ज्या नागरिकांनी सदरील जागेतील फ्लॅट खरेदी केल्या असतील त्यांना आता पैसे माघार घेण्याची वेळ आली आहे? पुणे महानगर पालिकेने काढलेले आदेश पाडले जातात का? किंवा काम चालूच राहणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.




