पुणे सिटी टाइम्स प्रतिनिधी
पुणे उपनगरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून, बांधकाम करताना नियमानुसार गौण खनिज उत्खननाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र काही ठेकेदार व बांधकाम व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

येवलेवाडी पानसरे नगर गल्ली क्र. २अ, कोंढवा बुद्रुक येथे बेकायदेशीर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, महापालिका व जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवायच ही बांधकामे चालू असल्याचे समोर आले आहे.

एनके हाईट्स शेजारी इरशाद पानसरे व वसीम पानसरे यांनी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून बांधकाम सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.याबाबत तहसीलदार हवेली कार्यालयातील तलाठ्यांकडे विचारणा केली असता, अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे व नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे तलाठ्याने सांगितले.
मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खननाची वाहतूक
बेकायदेशीरपणे गौण खनिज उत्खनन करून त्यातील माती, डबर, खडी व दगड यांची वाहतूक केल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन झाल्याचे स्पष्ट होते. ईटीएस मोजणी झाल्यास सुमारे १५ ते २० लाख रुपये दंड होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




