काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुकाई पोलिस चौकीत महिला कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच खाकी वर्दीतील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुकाई पोलीस चौकीत कार्यरत असणारी एक महिला पोलीस कर्मचारी भररस्त्यात मद्यधुंद (फुल तर्राट) अवस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे, ती वापरत असलेल्या कारला दोन्ही बाजूंना नंबर प्लेटच नसल्याचेही उघडकीस आले आहे. नागरिकांनी याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता तिने थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण हायव्होल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी एका कारमधून शेवाळवाळी येथे आली होती.तिच्या कारची धडक एका दुचाकीला लागली. दुचाकीस्वाराने प्रश्न विचारताच ती प्रचंड मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट जाणवत होते. रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष तिच्या कारकडे गेले असता, कारच्या पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना नंबर प्लेट नसल्याचे समोर आले.
नियम मोडणाऱ्या सर्वसामान्यांवर लगेच दंडात्मक कारवाई करणारे पोलीस स्वतःच विना नंबर प्लेटची गाडी कशी फिरवू शकतात? असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी तिला थांबवले आणि विचारणा केली. मात्र, चूक मान्य करण्याऐवजी सदर महिला कर्मचाऱ्याने नागरिकांवरच खाकीचा धाक दाखवत आरडाओरड सुरू केली. नागरिकांनी शांत करण्याचा प्रयत्न केला असता, तिने संयम सुटून थेट अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
विना नंबर प्लेट कार आणि मद्यधुंद अवस्था; व्हिडिओ व्हायरल
नागरिकांना वाहतुकीचे कडक नियम सांगणारे पोलीस स्वतः नंबर प्लेट नसलेली गाडी बिनधास्त वापरतात आणि त्यातही मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात धिंगाणा घालतात, हे पाहून घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली. उपस्थितांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. व्हिडिओमध्ये नंबर प्लेट नसलेली कार आणि त्या महिला कर्मचाऱ्याचे वादग्रस्त वर्तन स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुणेकरांमधून पोलिसांच्या या मनमानी आणि बेशिस्त कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“सर्वसामान्यांची नंबर प्लेट तुटली तरी दंड ठोठावणारे पोलीस स्वतः दोन्ही बाजूंना नंबर प्लेट नसलेली कार कशी चालवू शकतात? त्यात भररस्त्यात मद्यधुंद होऊन नागरिकांना शिवीगाळ करणाऱ्यांवर काय कारवाई होणार?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्याची माहिती मिळत आहे. संबंधित महिला कर्मचारी ही काळेपडळ पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या तुकाई पोलिस चौकीत कार्यरत असल्याची माहिती मिळाली तर अश्विनी केतकर असे त्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ती त्या वेळी कर्तव्यावर होती का, तिने मद्यप्राशन केले होते का, आणि विना नंबर प्लेटची कार कुणाची आहे, या सर्व बाबींची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या या कर्मचाऱ्यावर पोलीस प्रशासन नेमकी काय कठोर कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




