२ महिन्यांपासून शहेबाज उर्फ पुन्नू पोलिसांना गुंगारा देत होता.
ज्या नागरिकांची फसवणूक झाली त्यांनी खडक पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन.
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
आजकाल फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. काही ना काही कारणाने नागरिकांकडून पैसे उकळण्यासाठी टोळ्या कार्यरत आहेत, यात शंका नाही. मोमीनपुरा घोरपडे पेठेतील पुन्नू टोळीने अशीच लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात ६ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशी की, मोमीनपुरा घोरपडे पेठेतील पुन्नू शेख टोळी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून, या टोळीविरुद्ध यापूर्वीही बऱ्याच तक्रारी दाखल आहेत. या टोळीचा प्रमुख शहेबाज उर्फ पुन्नू नवाब शेख याने काशेवाडी भवानी पेठेतील अजहरुदीन इकबाल शेख यांना फोर्ड इंडीवर कार घ्यायची असल्याने त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर फोटो पाठविले. अजहर शेख यांना ती कार आवडली, परंतु ती खूप महाग असल्याने घेऊ शकत नाही, असे सांगितल्यावर शहेबाज उर्फ पुन्नू याने १५ ते १६ लाखात मिळेल असे सांगितले.

त्याची रक्कम जुबेर हुंडेकर, अरमान मलिक, सरफराज शेख, चेतन माने, रियाज उर्फ रियो, सैफ शेख यांच्या खात्यात जमा करायला सांगितले. फिर्यादी अजहरूदीन शेख यांनी नकार देत म्हटले की, मी तुझ्या मामाच्या खात्यात पैसे पाठवतो, कारण कार त्यांच्या शोरूममधून घ्यायची आहे. तर शहेबाज उर्फ पुन्नू याने सांगितले की, हे सर्वजण माझ्या मामाकडे कामाला आहेत, असे सांगून विश्वासात घेतले. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्या खात्यात पैसे जमा केले.
परंतु शहेबाज उर्फ पुन्नू याने वारंवार असे १० लाख ६८ हजार रुपये घेतले. मात्र कार दिली नाही. वारंवार विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे परत मागितल्यावर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला. अखेर अजहरुद्दीन इकबाल शेख यांनी खडक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार खडक पोलिसांनी ८ जणांविरुद्ध कलम ४०६ आणि ४२० नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच शहेबाज उर्फ पुन्नू नवाब शेख हा फरार झाला होता. त्याला खडक पोलिसांनी आज दि. ४ जून २०२६ रोजी ताब्यात घेत कोर्टात हजर केले आहे. पुढील तपास एपीआय अनिता तोंडे करत आहेत.
२४ लाखांची फसवणूक, आणखी व्याप्ती वाढण्याची शक्यता?
पोलिसांकडून माहिती घेतल्यास शहेबाज उर्फ पुन्नू टोळीने २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नागरिकांनी पुढे येऊन तक्रार केल्यास व्याप्ती आणखी वाढू शकते. म्हणून या टोळीला न घाबरता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहेबाज उर्फ पुन्नू याचे पुण्यातील अनेक गुन्हेगारांसोबत संबंध
शहेबाज उर्फ पुन्नू नवाब शेख हा गुन्हेगारांसोबत चांगले संबंध असल्याचे दाखवून नागरिकांची फसवणूक आणि लूट करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मोबाइल, लॅपटॉप, कार व इतर वस्तू स्वस्तात घेऊन देतो म्हणून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर स्थानिकांच्या अधिक माहितीनुसार, तो फसवणुकीच्या रकमेतून मुंबई पुणे करत असल्याचं सांगितलं आहे.




