सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्तुळात खळबळ.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करणा-या वरिष्ठ लिपिका विरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल आहे. पुणे लाचलुचपत विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
अनिल कोंडाजी आढारी वय-४० असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांनी तक्रार केल्यांतर पुणे एसीबीकडून पडताळणी करण्यात आली.
यानंतर सोमवारी आढारी विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आढारी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंगळवार पेठेतील उप विभाग क्रमांक ४ वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे.
तक्रारदार यांना कंपनीसाठी सरकारी कामे करण्यासाठी परवाना आवश्यक असल्याने त्यांनी बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता.परवाना देण्यासाठी आढारी याने १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
ही लाच त्याने स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी मागितली होती. तक्रारी अर्जावरुन पडताळणी केली असता अनिल आढारी याने लाच
मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आढारी विरिद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.