निर्धारित वेळेनंतरही मद्यविक्री आणि कर्णकर्कश डीजे सुरूच; ३ लाखांहून अधिक किमतीचे साहित्य जप्त, मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात प्रशासकीय नियमांची ऐशीतैशी करत पहाटे चार वाजेपर्यंत बेकायदा ‘हॅलोविन पार्टी’ सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने कारवाई करत ‘प्लंज’ (Plunge) पबचा मालक जितेश मेहता आणि व्यवस्थापक सुनील पवार यांच्यासह तब्बल सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात पोलिसांनी ३ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पहाटे ४ वाजेपर्यंत मद्याचा महापूर अन् डीजेचा दणदणाट
कोरेगाव पार्कमधील नामांकित ‘ज्वेल स्क्वेअर’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘प्लंज’ पबमध्ये ३१ ऑक्टोबरच्या रात्री ‘हॅलोविन पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. शासकीय नियमांनुसार पब आणि बार बंद करण्याची वेळ निश्चित असतानाही, १ नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजेपर्यंत ही पार्टी बिनबोभाट सुरू असल्याचा आरोप आहे. पबमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक उपस्थित होते आणि कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवले जात होते.

पोलिसांची धाड; ३ लाखांचे साहित्य जप्त
नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या छुप्या पार्टीची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री पबवर अचानक छापा टाकला. पोलीस पथक आत पोहोचले असता, ठरवून दिलेल्या वेळेनंतरही तिथे ग्राहकांची गर्दी, मद्यविक्री आणि मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी:
४ स्वाइप मशिन्स
डीव्हीआर (DVR) व हार्ड डिस्क
कॉम्प्युटर मॉनिटर
साऊंड सिस्टीम आणि पायोनियर डीजे प्लेयर मशीन
असा एकूण ३ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.
या ७ जणांवर दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी कठोर पाऊल उचलत एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
यामध्ये: १. जितेश मेहता (पब मालक) २. सुनील पवार (व्यवस्थापक ) ३. विराज (पार्टी आयोजक) ४. शुभम आचारी (सोशल मीडिया व बुकिंग समन्वयक) ५. राहुल सिंग (प्रवेश व्यवस्थापक / गेट मॅनेजमेंट) ६. डीजे ओंकार ७. डीजे श्रेयस
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचे काय?
पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा दाखल केला असला, तरी पहाटे ४ वाजेपर्यंत सर्रास मद्यविक्री सुरू कशी होती? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या विहित वेळेनंतर पबमध्ये मद्य पुरवले जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) नेमके काय करत होते? पबवर उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना निलंबनाची किंवा दंडात्मक कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता पुणेकरांमधून विचारला जात आहे. अधिक माहितीसाठी निरीक्षक कौसाडकर यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर अधिक्षकांना माहिती विचारली असता उत्तर देण्याचे टाळले आहे.




