फक्त २-३ गुंठ्यांत ७-८ मजली इमारती उभ्या… आवर घालणार कोण?
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
कोंढवा खुर्द, शिवनेरी नगर गल्ली क्र. २१ येथे बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. अवघ्या २ ते ३ गुंठ्यांच्या जागेत ७-८ मजली टॉलेजंग इमारती उभ्या राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मागे काही राजकीय पदाधिकाऱ्यांची साथ आणि पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शिवनेरी नगर गल्ली क्र. २१, अबनावे हाईट्सजवळ दोन राजकीय पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकामे केल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिसरातील माहितीनुसार, अमर पवळे आणि सतीश शिंदे या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत. राज्यस्तरीय पदाधिकारी असल्याने पालिका अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

रस्त्यालगतच काम सुरू असल्याने रोज वाहतूक कोंडी होत आहे. बांधकाम करणाऱ्यांची अरेरावी आणि धमक्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम सुरू असतानाही पालिका अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. “अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मिलीभगत नसती तर इतक्या उंच इमारती कशा उभ्या राहिल्या असत्या?” असा सवाल नागरिक करत आहेत.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. कनिष्ठ अभियंता तपास करतील, नोटीसा काढतील आणि दोन-चार दिवसांत कारवाई होईल.” मात्र नागरिकांचा सवाल आहे – एवढे दिवस कारवाईचा गाजर दाखवून कुंभकर्णाची झोप कशाला घेतली होती?आता पाहायचे आहे की, पालिका अधिकारी किती तत्परतेने कारवाई करतात…




