पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
बदली झालेल्या जागी रूजू न होता थेट मॅट मध्ये दाद मागणे एका पोलिस निरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बदली केलेल्या ठिकाणी हजर न होता,थेट मॅट कोर्टामध्ये अर्ज करून शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी मॅट कोर्टानेच संबंधित पोलिस निरीक्षकावर तात्काळ शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
मॅट कोर्टाचे आदेश प्राप्त होताच पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस निरीक्षक रवींद्र मानसिंग कदम यांना निलंबीत केले आहे.निलंबनाची कारवाई झालेले पोलिस निरीक्षक रवींद्र कदम हे यापुर्वी चंदननगर पोलिस ठाण्यात कर्तव्यास होते.
त्यांनी कर्तव्यात कसुरी केल्यामुळे त्यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चंदनगर पोलिस ठाण्यातून दंगा काबू पथकामध्ये बदली केली होती. त्यानंतर कदम हे दंगा काबू पथक येथे हजर होणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी बदलीविरूध्द तात्काळ मॅट कोर्टात धाव घेतली होती.
निरीक्षक कदम यांनी बदली विरूध्द मॅटकोर्टात दाखल केलेलाच अर्ज कोर्टाने रद्द केला आणि त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत ताशेरे ओढले आहेत.