पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
येरवडा जेलमध्ये कैद्यानांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. वारंवार जेलमध्ये असे प्रकार घडत आहेत. येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी झाले. हरीराम गणेश पांचळ आणि मुसा अबू शेख अशी जखमी झालेल्या न्यायालयीन बंदींची नावे आहेत.
याबाबत कारागृह शिपाई एकनाथ गांधले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद गु. रजि. नं.२१९/२३ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी न्यायालयीन कैदी अर्जुन बाजीराव वाघमोडे, रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर,ओंकार नारायण गाडेकर, मंगेश, शकील सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २ च्या जवळील हौदाजवळ ३१ मार्च रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर व इतरांना अटक केली होती.त्यानंतर त्यांची न्यायालयीन कैदी म्हणून येरवडा कारागृहातील किशोर विभागात ठेवण्यात आले आहे.या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. हरीराम पांचाळ व मुसा अबू शेख यांच्याशी या आरोपीची भांडणे झाले होती.
या भांडणाचा राग मनात धरुन अर्जुन वाघमोडे व इतरांनी तेथील प्लास्टिक बकेट,भाजी वाढण्याचे वरगाळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. हे कारागृह शिपायांना समजल्यानंतर त्यांनी पांचाळ व शेख यांना तातडीने तेथून बाजूला नेले. दोघांवर उपचार करण्यात आले असून येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.