पुणे महानगर पालिकेच्या कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील ३ परवाना निरीक्षकांचे निलंबन; पुणे महानगर पालिकेत मोठी खळबळ उडाली.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे महानगर पालिकेच्या कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील ३ परवाना निरीक्षकांचे निलंबन करण्यात आल्याची घटना घडल्याने पुणे महानगर पालिकेत मोठी खळबळ उडाली आहे.पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील नदीपात्रामध्ये नियमांचे उल्लंघन करुन, वृक्षतोड करुन होर्डिंग लावल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील ३ परवाना निरीक्षकांना निलंबित केले आहे.

याप्रकरणी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तिघांवर बुधवारी १३ सप्टेंबर २०२३ रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक राजेंद्र किवटे,राजेंद्र राऊत आणि लक्ष्मीकांत शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पुणे महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी आदेश काढले आहेत. संभाजी पोलीस चौकीच्या पाठीमागे नदीपात्रात निलेश सुरेश चव्हाण यांनी नियमांचे उल्लंघन करुन तसेच वृक्षतोड करुन होर्डिंग उभारले होते. याबाबत वृत्तपत्रांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), उपायुक्त परवाना व आकाश चिन्ह विभाग, उपायुक्त परिमंडळ ५, महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय यांनी ३० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.

त्येवळी निलेश चव्हाण यांनी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकून वृक्षतोड केल्याचे दिसून आले. तसेच जाहिरात फलक उभारताना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या आहेत.यामध्ये तीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली असताना संपूर्ण १०० फुटांचे एकच होर्डिंग उभे केले आहे.

पुलाच्या भरावाला छेद देऊन होर्डिंग उभे करणे, जागेवर पोलीस चौकी असताना खासगी मालकी कशी होऊ शकते याबाबत स्पष्टता नाही, वृक्षतोड करण्यात आली असून वृक्षतोडीचा परवाना घेतला नाही,जागेचा मोजणी नकाशा नाही, पोलीस विभागाचा अभिप्राय नाही, होर्डिंग उभे करण्यास परवानगी देणाऱ्यांची नावे नाहीत,अशा आक्षेपार्ह त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात परवाना निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने तिघांना मनपा सेवाविनियम नियमानुसार निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here