पालिकेकडून शून्य कारवाई, अभय देण्याचे आरोप
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी
पुणे: कोंढवा भागात बेकायदेशीर बांधकामांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. पालिका, पोलिस आणि प्रशासनाची भिती न बाळगता ६ ते ८ महिन्यांत ७-८ मजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. यातील एका गंभीर प्रकाराकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.कोंढवा खुर्द येथील भैरवनाथ मंदिराच्या अगदी पाठीमागे गौण खनिजांचे बेकायदेशीर उत्खनन करून, पालिकेचा महसूल बुडवत भव्य ‘ट्रम टॉवर्स’ उभे करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या बेकायदेशीर बांधकामामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे स्थानिक नागरिकांचे आरोप आहेत.नागरिकांनी सांगितले की, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती उपसून बांधकाम केले गेले असून, त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांकडे या बांधकामाची माहिती घेतली असता, कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरीही इमारत पूर्ण उभी राहिलेली असल्याने, पालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याचे सूचित होत आहे.

एक स्थानिक रहिवासी म्हणाले, “मंदिराच्या पाठीमागे एवढे मोठे बांधकाम होत असताना पालिकेला दिसत नाही का? परवानगी नाही तर ही इमारत कशी उभी राहिली? सत्तेचा दुरुपयोग करून बेकायदेशीर बांधकामे केली जात आहेत.”

पालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आणि बांधकाम थांबवण्यात न आल्याने, शिवसेना कार्यकर्त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे कोंढव्यात बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांमध्ये प्रशासनाची भीती उरली नसल्याचे दिसून येते.

पालिकेकडून स्पष्टीकरणाची मागणी
या प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण देण्यात यावे, बेकायदेशीर बांधकामे तत्काळ पाडावीत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोंढव्यातील नागरिक करत आहेत.
सत्ताधारी पक्षांचा वापर बेकायदेशीर बांधकामांसाठी?
कोंढव्यात बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांमध्ये प्रशासनाची भीती उरली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवसेना कार्यकर्ते या प्रकारात शामिल असल्याने, राजकीय संरक्षण मिळत असावे, अशी चर्चा जोरात आहे. क्रमशः


