पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
कोंढवा (पुणे): कोंढव्यातील नागरिकांना बेकायदेशीर बकरा मंडींनी हैराण केले आहे. रस्त्यावर उभ्या केलेल्या पत्र्याच्या शेड्स, गोंधळ आणि दुर्गंधी यामुळे रोजचा जीवनक्रम विस्कळीत झाला आहे. मुस्लिम बांधवांची बकरी ईद जवळ आल्याने ही बेकायदेशीर बकरा मंडी आणखी वाढणार असल्याने स्थानिक कोंढवाकर संतापले आहेत.

नागरिक म्हणतात, “उठसूठ कोणीही बकरे आणून रस्त्यावर विकायला लागतो. वाहतूक कोंडी तर सोडाच, पण जनावरांचा दुर्गंध आणि घाण यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.”

पोलिस-महापालिकेकडे जोरदार मागणी
कोंढव्यातील रहिवासी आता पोलिस आणि पुणे महानगरपालिकेला थेट आव्हान देत आहेत. “रस्त्यावर पत्र्याचे शेड मारून बकरे विकण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये. बेकायदेशीर बकरा मंडींवर तात्काळ कारवाई करा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरोग्य विभाग झोपला?
जनावरे विक्रीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी आणि बोकड निरोगी असल्याचे सर्टिफिकेट अनिवार्य आहे. मात्र कोंढव्यात ही प्रक्रिया खंडीपणे पाळली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांचा आरोग्य धोक्यात आला आहे.
बोकडांच्या किंमती गगनाला
सर्वात मोठा फटका बसला आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशाला. गेल्या काही वर्षांत कोंढव्यात बेकायदेशीर बकरा मंडी वाढल्याने बोकडांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.
पूर्वी: १० ते १५ हजार रुपये
आता: ४० ते ४५ हजार रुपये
यामुळे अनेक सामान्य कुटुंबे बकरी ईदसाठी बोकड खरेदी न करण्याचा निर्णय घेत आहेत. पूर्वी चाकण, देवणार, यवत, लक्ष्मी बाजारसारख्या ठिकाणी स्वस्तात बकरे मिळत असत, मात्र आता कौसरबागेतील या मंडींमुळे संपूर्ण बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. कौसरबाग परिसरात बोकड महागात विकल्या जाऊ लागल्याने सर्वजण बाहेरून बोकड आणून कोंढव्यात महागात विकत असल्याचे दिसून आले आहे.



