पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी भाग : ३
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील खराडी–वाघोली परिसरात नियम धाब्यावर बसवून होर्डिंग्ज उभारण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि मनपाच्या जागांवर उभे असलेले अनेक होर्डिंग्ज पाहता, येथे महापालिकेची परवानगी लागते की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

जाहिरातफलक उभारण्यासाठी परवानगी, शुल्क, संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र आणि नियमांचे पालन बंधनकारक असताना अनेक होर्डिंग्जवर परवानगी क्रमांक, वैधतेचा कालावधी व एजन्सीची माहितीच दिसत नाही. मग हे होर्डिंग्ज कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत? मनपाचा महसूल कोणाच्या खिशात जात आहे? आणि कारवाई करणारे अधिकारी नेमके कोणाची वाट पाहत आहेत? असा गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे.

महापालिकेच्या जागेवरच अनधिकृत होर्डिंग्ज उभे राहत असतील, तर सामान्य नागरिकांनी नियमांचे पालन का करावे? एका बाजूला किरकोळ अतिक्रमणावर तातडीने कारवाईचा बडगा उगारला जातो; दुसऱ्या बाजूला मोठे होर्डिंग्ज मात्र प्रशासनाच्या डोळ्यांसमोर उभे राहूनही अभय मिळवत आहेत. मग यांना अभय देणारे कोण?
मागील बातमी }}} पुणे : खराडीमधील मनपा दवाखान्यात रुग्ण बरे होतात,पण अनधिकृत होर्डिंग्ज मात्र पुन्हा जिवंत होतात!
पावसाळ्यात होर्डिंग कोसळून अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? जीवितहानी झाल्यावर चौकशी समिती नेमण्यापेक्षा, आजच प्रत्येक होर्डिंगची परवानगी, शुल्क आणि सुरक्षिततेची तपासणी सार्वजनिक करावी.
नागरिकांचा थेट सवाल :
“खराडी–वाघोलीत होर्डिंग उभारण्यासाठी मनपाची परवानगी लागते की सत्तेची, पैशाची आणि ओळखीची परवानगी पुरेशी असते?” प्रभाग क्रमांक ४ मधील सर्व होर्डिंग्जची तातडीने पाहणी करून अनधिकृत फलक हटवावेत, संबंधित जाहिरात एजन्सी व जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी आणि महसूल नुकसानीची वसुली करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. क्रमशः




