पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी भाग : ४
खराडी : सर्वे नं. १, खराडी, खराडी पोलिस स्टेशनजवळ टेकडी फोडून रस्ता तयार करण्यात आला. टेकडी ढासळू नये आणि रस्त्यावरील नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी म्हणून येथे सुरक्षा भिंत उभारण्यात आली. मात्र, आता याच सुरक्षा भिंतीवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

टेकडीचा भार रोखण्यासाठी उभारलेल्या भिंतीवर अतिरिक्त लोखंडी संरचना आणि मोठे जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली का? या भिंतीची भारक्षमता किती आहे? ती तपासण्यात आली का? संबंधित होर्डिंग्जना वैध परवानगी आणि संरचनात्मक स्थैर्य प्रमाणपत्र आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सर्वे नं. १ परिसरातील हा रस्ता खराडीच्या आयटी हबकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज हजारो आयटी कर्मचारी, नागरिक आणि वाहनचालक या मार्गाने प्रवास करतात. पावसाळा आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर या होर्डिंग्जमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असाच एक प्रसंग ७ ऑक्टोबर २०१८ रोजी जुना बाजार चौकात झाला होता. त्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली होती. पुन्हा त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहिली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मागील बातमी वाचा }}} भाग : ३ खराडी–वाघोलीत होर्डिंग माफियांचा सुळसुळाट; मनपाची परवानगी फक्त कागदावरच? या भोंगळ कारभाराकडे पालिका आयुक्त नवल किशोर राम दखल घेतील का?
स्थानिक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या जाहिरात विभाग, बांधकाम विभाग आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयाने तातडीने संयुक्त तांत्रिक पाहणी करून सुरक्षा भिंतीवर उभारलेल्या प्रत्येक होर्डिंगची कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. नियमबाह्य किंवा धोकादायक होर्डिंग्ज त्वरित हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
नागरिकांचा सवाल मात्र स्पष्ट आहे — टेकडी सुरक्षित ठेवण्यासाठी बांधलेली सुरक्षा भिंत जाहिरातींसाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली? आणि एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? पालिका आयुक्त की आकाश चिन्ह परवाना उपायुक्त किंवा परवाना निरिक्षक? असा गंभीर प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे. क्रमशः




