रियाज अंबर यांचा साहेबांना नमस्कार आणि कोंढव्यात चमत्कार
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुणे : कोंढवा खुर्दमधील भाग्योदय नगर गल्ली क्रमांक १४ मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या ४ फूट रुंदीच्या गल्लीत ५ मजली टोलेजंग इमारत उभी राहिल्याने स्थानिक नागरिक चक्रावून गेले आहेत. ही इमारत रियाज अंबर यांनी बेकायदेशीरपणे बांधली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मालिक रेसिडेन्सी परिसरातील सर्वे नंबर ५६/१७/१२ येथे, ब्राइट बास्केट बेकरीच्या मागे असलेल्या सुमारे २ गुंठे जागेत हे बांधकाम सुरू आहे.

इतक्या अरुंद जागेत ५ मजली इमारत कशी उभी राहू शकते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. “४ फुटाच्या गल्लीत इतकी मोठी इमारत बांधणं म्हणजे थेट कायद्याची पायमल्ली,” असं स्थानिक रहिवाशांनी सांगितलं.

नागरिकांच्या मते, रियाज अंबर यांना राजकीय पाठींबा असल्याने आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांनी कोंढवा परिसरात २५ हून अधिक बेकायदेशीर इमारती उभ्या केल्या असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या सर्व इमारतींची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांनी प्रशासनाच्या झोपेवरही टीका केली आहे. “कोंढवा दिवसेंदिवस बेकायदेशीर बांधकामांमुळे बकाल होत आहे. पण अधिकाऱ्यांना काहीच देणेघेणे नाही,” असं तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारीही नागरिक करत आहेत.आता प्रशासन किती तत्परतेने कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




