“वेळोवेळी सूचना दिल्या, तरीही पाटी लावली जात नाही; मग नियमांची अंमलबजावणी करणार कोण?”
पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुणे शहरातील संगमवाडी परिसरात जाहिरात होर्डिंगला आवश्यक असलेली सांकेतिक क्रमांकाची पाटी लावली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित परवाना निरीक्षकांना याबाबत विचारणा केली असता, संबंधित होर्डिंगधारकांना वेळोवेळी सूचना दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, वारंवार सूचना देऊनही पाटी लावली जात नसेल, तर महापालिकेच्या नियमांना संबंधितांकडून केराची टोपली दाखवली जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सूचना देऊनही कार्यवाही नाही, मग अधिकारांचा उपयोग काय?
महापालिकेच्या संबंधित विभागाकडून केवळ सूचना देण्याची औपचारिकता पार पाडली जात असेल, तर त्याचा उपयोग काय? नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते का? संबंधित होर्डिंगचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याबाबत काही कार्यवाही प्रस्तावित आहे का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

निरीक्षकांची हतबलता की कारवाईचा अभाव?
“आम्ही वेळोवेळी सूचना दिल्या; मात्र संबंधितांकडून सांकेतिक क्रमांकाची पाटी लावली जात नाही,” अशी भूमिका संबंधित निरीक्षक घेत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सूचना देऊनही नियमांचे पालन होत नसेल, तर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? की नियमभंग करणाऱ्यांसमोर प्रशासनही हतबल झाले आहे?
नागरिकांची मागणी
संगमवाडी परिसरातील ज्या होर्डिंगवर सांकेतिक क्रमांकाची पाटी नाही, त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित होर्डिंगधारकांना अंतिम मुदत द्यावी. मुदतीत पाटी न लावल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. तसेच, यापूर्वी दिलेल्या सूचनांचा तपशील, केलेली कार्यवाही आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका सार्वजनिक करावी.केवळ सूचना देणे म्हणजे कर्तव्यपूर्ती नव्हे; नियमांची अंमलबजावणी करून दाखवणे, हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे! क्रमशः




