पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.
पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध आझम कॅम्पस (महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी) प्रशासनाला महसूल विभागाकडून मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. कॅम्पसच्या आवारात केलेल्या कथित बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाप्रकरणी दाखल केलेले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांनी (SDO) फेटाळून लावले आहे. त्यामुळे आता संस्थेवर तब्बल २ कोटी ६५ लाख ७ हजार रुपयांच्या दंडात्मक वसुलीची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

आझम कॅम्पस परिसरातील इमारतींच्या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर दगड आणि मातीचे (गौण खनिज) उत्खनन करण्यात आले होते. याची तक्रार अजहर अहमद खान यांनी तहसीलदारांकडे केली होती.
हे उत्खनन महसूल विभागाची पूर्वपरवानगी न घेता आणि रॉयल्टी न भरता केल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आला. याप्रकरणी तहसीलदार कार्यालयाने संस्थेला २ कोटी ६५ लाख रुपयांचा दंड ठोठावून वसुलीची नोटीस बजावली होती.
मागील बातमी वाचा }}} पुण्यातील पी.ए. इनामदार यांच्या आझम कॅम्पसला कोट्यवधी रूपयांचा दंड! अजहर खान यांच्या पाठपुराव्याला यश.

या दंडात्मक कारवाईविरोधात संस्थेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेली कागदपत्रे तपासल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी संस्थेचे अपील फेटाळत तहसीलदार कार्यालयाचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयामुळे प्रशासनाकडून आता थेट वसुलीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता हा दंड वसूल केला जाणार का? याकडे लक्ष टिकून राहणार आहे.




